
Mumbai : आमच्या कोणत्याही अटी नाहीत, मात्र हिंदुत्वाशी तडजोड नाही : एकनाथ शिंदे

प्रशांत बारसिंग
मुंबई : (Mumbai) आमच्या कोणत्याही अटी नाहीत, मात्र हिंदुत्वाशी तडजोड नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी माध्यमांना दिली आहे.
आमच्यासोबत 46 आमदार
सध्या राज्यात राजकीय पेच निर्माण झाला आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे काही आमदारांना घेऊन सध्या गुवाहाटीमध्ये आहेत. दरम्यान, माध्यमांनी त्यांना संपर्क साधला असता एकनाथ शिंदे म्हणाले की, आमच्यासोबत 46 आमदार आहेत. यामध्ये शिवसेनेसह(Shiv Sena) इतरही आमदांरांचा समावेश आहे. हा आकडा अजून वाढणार आहे. आमच्या कुठल्याही अटी नाहीत, परंतु हिंदुत्वाशी आम्ही तडजोड करणार नाही.
राजीनामा द्यायचा की नाही हा त्यांचा निर्णय
एकनाथ शिंदे म्हणाले की, हिंदुत्व आमच्यासाठी महत्वाचे आहे. माझ्यासोबत असलेले आमदार हिंदुत्वाशी एकनिष्ठ आहेत. सत्ता प्राप्त करण्यासाठी हिंदुत्वाशी तडजोड कधीच करणार नाही. मुख्यमंत्र्यांनी(Chief Minister) राजीनामा द्यायचा की नाही हा त्यांचा निर्णय आहे. आमची सर्व आमदारांची संध्याकाळी बैठक होणार आहे, त्यानंतर आम्ही निर्णय घेणार आहोत. आमच्याकडे आवश्यकतेपेक्षा अधिक संख्याबळ आहे.
आम्ही शिवसेना सोडली नाही आणि सोडणारही नाही
एकनाथ शिंदे म्हणाले की, माझ्यासोबत असलेल्या शिवसेना आमदार म्हणणे आहे की, बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे(Anand Dighe) यांनी दिलेल्या हिंदुत्वाच्या शिकवणीनुसार आम्ही पुढे जात आहोत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत. आम्ही शिवसेना सोडली नाही, आम्ही शिवसेना सोडणार नाही. बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांची भूमिका घेऊन आम्ही पुढचे राजकारण आणि समाजकारण करणार आहोत. बाळासाहेबांनी या देशाला हिंदुत्वाचा विचार दिला आहे. त्यामध्ये कुठलीही तडजोड आम्ही करणार नाही आणि हाच विचार पुढे घेऊन जाऊ.