
Mumbai: मुंबई मनपा सार्वत्रिक निवडणूक-2022 करिता प्रभागनिहाय प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध

नवीन नावांचा समावेश किंवा वगळणी इत्यादी कार्यवाही होणार नाही.
लतिका तेजाळे
मुंबई : (Mumbai) आज माध्यमांशी सवांद साधताना डॉ. संजीव कुमार म्हणाले, राज्य निवडणूक आयोग यांच्या आदेशान्वये, बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2022 करिता मतदार याद्या अद्ययावत करण्याचा कार्यक्रम तयार करण्यात आला असून प्रभागनिहाय प्रारुप मतदार याद्या दिनांक 23 जून 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. सदर याद्या मुंबई महापालिकेच्या https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर तसेच मुंबई महापालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयातील करनिर्धारण व संकलन खात्यातील निवडणूक विभागात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यावर दिनांक 1 जुलै 2022 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत.
भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व दिनांक 31 मे 2022 रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदार संघाच्या मतदार याद्या मुंबई महापालिका निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. या ठिकाणी एक गोष्ट प्रशासनाकडून नमूद करण्यात येते की, माननीय राज्य निवडणूक आयोगाकडून प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना नवीन नावांचा समावेश किंवा नावांची वगळणी इत्यादी कार्यवाही करण्यात येणार नाही.
हरकती व सुचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱया चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलला असेल तर योग्य प्रभागात नाव समाविष्ट करणे किंवा विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसेल, तर नाव अंतर्भूत करणे इत्यादी दुरुस्त्या करण्यात येतील.
सदर दुरुस्त्या करण्याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयातील, करनिर्धारक व संकलक यांचे कार्यालयातील निवडणूक विभागात नागरिकांनी संपर्क करावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार, उप आयुक्त (विशेष) श्री. संजोग कबरे यांनी केले आहे.