
Mumbai : पोलिसांना दिलेल्या ‘त्या’ दुचाकी डोमलाईट, सायरन आणि स्टिकरविनाच

आता काढले जाणार टेंडर
मुकुंद लांडगे
मुंबई : मुंबई पोलीसदलात गस्तीसाठी(for patrolling) लागणारी नवीन दुचाकी वाहने खरेदी करून ती नायगाव येथील मैदानावर गेल्या अनेक महिन्यांपासून धूळ खात पडून होती. आता ही सर्व वाहने मुंबईतील सर्व ठाण्यातील पोलिसांना देताना त्यांच्यावर पोलीस स्टिकर, डोमलाईट, तसेच सायरनही लावण्यात आलेले नाहीत, त्यामुळे या दुचाकी कशा चालवायच्या?, असा सवाल पोलीस करीत आहेत. तर याबाबतचे काम सुरू असून, लवकरच टेंडर काढून या उणिवा दूर करण्यात येतील, अशी माहिती पोलिसांच्या मोटार परिवहन विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त निशिकांत मोरे यांनी दिली.
घाईघाइने करण्यात आले वाटप
पाच महिन्यांपूर्वी पोलीसदलासाठी(police force) जवळपास साडेतीनशे नवीन स्कूटी प्रकारच्या दुचाकींची खरेदी करण्यात आली होती. मात्र, त्यांचे वाटप न होता ती भोईवाडा भागातील नायगाव वाहतूक मुख्यालयात पडून होती. या नव्याकोऱ्या दुचाकी येथे पडून असल्याने ऊन, पावसाचा मारा झेलत खराब होण्याची भीती पोलिसांतून व्यक्त होत होती. पोलिसांच्या ताफ्यात दाखल न करता या दुचाकी उघड्या मैदानात उभ्या का? असा सवालही उपस्थित केला जात होता. मात्र, गेल्याच आठवड्यात या सर्व वाहनांचे वाटप मुंबईभरातील सर्व पोलीस ठाण्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार २- ३ असे वाटप करण्यात आले. मात्र, हे वाटप करताना या वाहनावर डोमलाईट, सायरन आणि पोलीस नामक स्टिकर लावण्यात आलेले नाहीत. ही वाहने बराचकाळ नायगावमध्ये पडून असल्याने त्यांचे वाटप घाईघाइने करण्यात आले. मात्र, त्यात या सुविधा नसल्याने आता पुन्हा ही वाहने वादाच्या भोवऱ्यात सापडली आहेत.
दरम्यान, मुंबईतील ९४ पैकी प्रत्येक पोलीस ठाण्यात(police stations) सद्यस्थितीत प्रत्येकी १५ वाहने आहेत. जवळपास एकूण ४ हजार ५०० वाहने आहेत. मात्र, ती चालविणाऱ्याच्या तुलनेत मनुष्यबळ कमी आहे. असे असतानाही ही वाहने मागवून वितरीत करण्यात आली, असा आरोप पोलीस बोलताना करीत आहेत.
भोईवाडा-नायगाव भागातील पोलिसांच्या हुतात्मा मैदानात(हॉकी मैदान) गेल्या पाच महिन्यांपासून अंदाजे साडेतीनशे मोटरसायकली धूळ खात उभ्या होत्या त्यांचे वाटप गेल्याच आठवड्यात झाले आहे. पोलिसांना वाटप केलेल्या या वाहनांवर सायरन, स्टिकर आणि डोमलाईट(dome lights) बसविण्यासाठी आम्ही टेंडर काढत आहोत. त्याची वर्क ऑर्डर काढली जात असून, लवकरच कार्यवाही होणार आहे, असे याबाबत निशिकांत मोरे (अप्पर पोलीस आयुक्त, मोटार परिवहन विभाग) यांनी म्हटले आहे.