
Mumbai : राष्ट्रध्वजाचे घरोघरी जलद वितरण करावे : डॉ. इकबाल सिंह चहल

• राष्ट्रध्वज संहितेनुसार संपूर्ण मान राखून राष्ट्रध्वज फडकवावा, अभियान कालावधी संपल्यानंतर संस्मरणीय आठवण म्हणून राष्ट्रध्वज जपून ठेवण्याचेही आवाहन
लतिका तेजाळे
मुंबई : (mumbai) भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणाऱ्या घरोघरी तिरंगा अर्थात ‘हर घर तिरंगा’ या अभियानासाठी मुंबईतील प्रत्येक घरात मनपाच्यावतीने राष्ट्रध्वज तिरंगा पोहोचेल अशारितीने व जलद पद्धतीने वितरण करावे, असे निर्देश मनपा आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल(Dr. Iqbal Singh Chahal) यांनी घरोघरी तिरंगा अभियान पूर्वतयारी आढावा बैठकीत दिले आहेत.
सर्व मुंबईकरांनी राष्ट्र ध्वजसंहितेनुसार तिरंगा(flag) ध्वजाचा मान राखून आपल्या घरावर तिरंगा फडकवावा आणि अभियान कालावधी संपल्यानंतर संस्मरणीय आठवण म्हणून राष्ट्रध्वज जपून ठेवावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.

प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर स्वयंस्फूर्तीने राष्ट्रध्वज तिरंगा फडकवावा, यानिमित्ताने देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान आणि योगदान देणाऱ्या ज्ञात-अज्ञात सर्व स्वातंत्र्यवीरांचे स्मरण व्हावे, या हेतूने सदर अभियान राबविले जाणार आहे. स्वातंत्र्य लढ्यातील मुंबईचे मोलाचे योगदान पाहता मुंबई मनपाने स्वत: सर्व मुंबईकरांसाठी राष्ट्रध्वज तिरंगा खरेदी करण्याचा आणि ते घरोघरी पोहोचविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यादृष्टीने संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा जोमाने कार्यरत असून, घरोघरी तिरंगा अभियानाच्या(the tricolor campaign) यशस्वीतेसाठी व्यापक प्रमाणावर जनजागृतीदेखील केली जात आहे.
या संपूर्ण पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी तसेच अंमलबजावणीच्या दृष्टीने महानगरपालिका आयुक्त(Municipal Commissioner) डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिका मुख्यालयातील आयुक्तांच्या सभागृहात ४ ऑगस्ट रोजी बैठक घेण्यात आली. याप्रसंगी अतिरिक्त मनपा आयुक्त आशिष शर्मा, पी. वेलरासू, डॉ. संजीव कुमार, मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर, महानगरपालिकेतील सहआयुक्त अजित कुंभार, मिलीन सावंत, सुनील धामणे, चंद्रशेखर चोरे यांच्यासह सर्व परिमंडळाचे सहआयुक्त, उपआयुक्त, संबंधित उपायुक्त, सहाय्यक आयुक्त आणि खातेप्रमुख उपस्थित होते.
महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यावेळी म्हणाले की, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणे ही संपूर्ण देशासाठी अभिमानाची बाब आहे, त्यामुळे मुंबईकरांसाठी राष्ट्रध्वज खरेदी करून घरोघरी पोहोचविण्याचे मोठे लक्ष्य महानगरपालिकेने समोर ठेवले आहे. राष्ट्रध्वज खरेदीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आता सर्व २४ विभाग कार्यालयांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील निश्चित घरांच्या संख्येनुसार राष्ट्रध्वज तिरंगापुरवठा टप्प्याटप्प्याने केला जात आहे. सर्व विभाग कार्यालयांनी राष्ट्रध्वजसाठा प्राप्त झाल्यानंतर दररोज त्याचे योग्यरीतीने आणि जलद कार्यवाही होईल, अशारीतीने वितरण करावे. घरोघरी राष्ट्रध्वज पोहोचविताना काही प्रमाणात चित्रीकरणदेखील करावे. तसेच वितरण कार्यपद्धती सुरळीतपणे सुरू आहे किंवा कसे, याची खातरजमा करण्यासाठी देखरेख पथकदेखील नेमावे. घरोघरी तिरंगा अभियान कालावधीत सर्व नागरिकांनी राष्ट्रध्वज संहितेप्रमाणे तिरंगा झेंडा फडकवावा. अभियान कालावधी संपल्यानंतर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची संस्मरणीय आठवण(memorable reminder) म्हणून हा तिरंगा झेंडा सर्व नागरिकांनी जपून ठेवावा, या अनुषंगाने आवाहन करावे.
दरम्यान, मुंबई मनपाच्यावतीने एकूण ३५ लाख राष्ट्रध्वजांसाठी मागणी नोंदविण्यात आली आहे. त्यापैकी आतापर्यंत एकूण दहा लाख राष्ट्रध्वज तिरंगासाठा प्राप्त झाला आहे. उर्वरित सर्व साठा टप्प्याटप्प्याने येत्या तीन दिवसात प्राप्त होणार आहे. प्राप्त झालेला साठा विभाग कार्यालयांनी नोंदविलेल्या पूर्व मागणीनुसार त्या-त्या प्रमाणात वितरित केला जात आहे, अशी माहिती उपायुक्त रमाकांत बिरादार यांनी याप्रसंगी दिली.