
Mumbai : ‘तेच’ खरे दबंग : मुख्यमंत्री

प्रशांत बारसिंग
मुंबई : आनंद दिघे हेच खरे दबंग होते, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी केले. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाचा ट्रेलर लाँचचा भव्य सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहकुटुंब हजर होते. यावेळी शिवसेना नेते संजय राऊत, एकनाथ शिंदे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते.
आनंद दिघे(Anand Dighe) ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचे मोठे नेते होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर दिघे यांचे शिवसेनेत मोठे स्थान होते. बाळासाहेबांना ‘शिवसेना प्रमुख’ अशी उपाधी होती, तर दिघे यांना ‘धर्मवीर’ म्हटले जायचे. आनंद दिघे यांचा शिवसेनेसह ठाणे जिल्ह्यात मोठा दबदबा होता. आनंद दिघे यांनी जिल्हा कुणाच्याही हाती लागू दिला नव्हता. दिघे यांच्यानंतर ही परंपरा एकनाथ शिंदे यांनी कायम ठेवली आहे. शिवसेना आणि अख्खा ठाणे जिल्हा एकनाथ शिंदे यांच्यात आनंद दिघे यांना बघत आहे, अशी उघडपणे चर्चा आहे.
अभिनेता रितेश देशमुख आणि सलमान खान यांची देखील उपस्थिती
आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाचा ट्रेलर लाँचचा भव्य सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहकुटुंब हजर होते, तर बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख(Riteish Deshmukh) आणि सलमान खान यांनी देखील विशेष उपस्थिती लावली. यावेळी सलमान खान याने आपल्याला ट्रेलर आवडला असल्याची प्रतिक्रिया चक्क मराठीतून दिली. आनंद दिघे हेच खरे ‘दबंग’, असे यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
आनंद दिघे आणि माझ्यात साम्य : सलमान खान
चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर सलमान खानने देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. सलमान म्हणाला की, आनंद दिघे आणि माझ्यात बरेच साम्य आहे.
यावेळी सलमान खानने चक्क मराठीतून संवाद साधला. सलमान म्हणाला की, माझे नाव सलमान खान. मला या चित्रपटाचा ट्रेलर खूप आवडला.
यानंतर सलमान म्हणाला की, मी आताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलत होतो तेव्हा आनंद दिघे यांच्याबद्दल काही गोष्टी कळल्या, ज्या मला आमच्यात सारख्या वाटल्या. आनंद दिघे एका बेडरूममध्ये राहायचे आणि मी पण एक बेडरूममध्येच राहतो. त्यांचेही लग्न झाले नव्हते आणि माझेही लग्न झालेले नाही. याआधीही ‘धर्मवीर’ नावाचा चित्रपट आला, जो तुफान चालला. या चित्रपटालाही तितकेच यश मिळेल, असे म्हणत सलमान खानने शुभेच्छा दिल्या.
प्रसाद ओकची खास एन्ट्री
या ट्रेलर लाँचिंग सोहळ्यात चित्रपटात आनंद दिघे यांची भूमिका साकारणारा अभिनेता प्रसाद ओक(Prasad Oak) खास त्यांच्या वेशात आणि त्यांच्या स्टाईलमध्ये अवतरला होता. त्याच्या एन्ट्रीने उपस्थित सगळेच भारावून गेले. ट्रेलरमध्येही या चित्रपटाची दमदार झलक पाहायला मिळाली आहे.