
Mumbai : ठाकरे सरकार भ्रष्टाचारी; एकनाथ शिंदे आणि ‘त्या’ आमदारांचा दावा

Indiagroundreport वार्ताहर
गुवाहाटी : महाराष्ट्रामध्ये(Maharashtra) सत्तेत असणारे ठाकरे सरकार हे भ्रष्टाचारी असून, त्यांच्यामुळे मागील अडीच वर्षांमध्ये आम्हालाही अनेकदा वाईट वागणुकीचा सामना करावा लागला, असा धक्कादायक दावा एकनाथ शिंदेंसोबत असणाऱ्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी केला आहे. इतकेच नाही तर केवळ सत्तेसाठी विरोधी विचारसणीच्या पक्षांसोबत शिवसेनेच्या नेतृत्वाने सरकार स्थापन केल्याचा दावाही या आमदारांनी केला आहे.
महाराष्ट्राच्या १४ व्या विधानसभेचे आम्ही शिवसेनेचे सदस्य आहोत. आम्ही एकमताने एकनाथ शिंदे यांची ३१ ऑक्टोबर २०१९ मध्ये शिवसेनेचे विधिमंडळाचे गटनेते म्हणून निवड केली होती. २०१९ साली झालेल्या १४ व्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी निवडणूकपूर्व युती झाली होती. मात्र, सरकारमधील भ्रष्टाचारामुळे पक्षातील सदस्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख(Anil Deshmukh) आणि विद्यमान अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पोलिसांच्या नियुक्त्यांबरोबरच मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे. तसेच या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे आम्हाला या अडीच वर्षांच्या कालावधीमध्ये बरेच काही ऐकावे लागले असल्याचाही उल्लेख या पत्रामध्ये करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस(NCP) आणि काँग्रेससारख्या विरोधी विचारसरणीच्या पक्षांसोबत युती केल्यापासून आमच्या पक्षामध्ये फारच गोंधळ सुरु आहे. महाराष्ट्रामध्ये सत्ता मिळविण्यासाठी आमच्या पक्षाने मूळ धोरणांपासून प्रतारणा केली आहे. मागील अडीच वर्षांपासून हा प्रकार सुरु आहे. मराठी माणसासाठी लढण्याची शिवसेनेची भूमिकाही यासारख्यामुळे मागे पडली आहे, अशी टीका या आमदारांनी केली आहे.
शिवसेनेच्या(Shiv Sena) नेतृत्वाने निवडणूकपूर्व युतीऐवजी विरोधी विचारसणीच्या पक्षांसोबत सत्ता स्थापन केली. केवळ सत्तेसाठी पक्षनेतृत्वाने हा निर्णय घेतला असून, यामुळे शिवसेनेचे प्रतिनिधी म्हणून आम्हाला बरेच भोगावे लागल्याचा दावा या आमदारांनी(MLAs) केला आहे.