
Mumbai : स्वप्ना पाटकर धमकी प्रकरण : तपासाच्या परवानगीसाठी पोलिसांची न्यायालयात धाव

मुकुंद लांडगे
मुंबई : स्वप्ना पाटकर धमकीप्रकरणी वाकोला पोलिसांनी संजय राऊत(Sanjay Raut) यांच्या तपासाची परवानगी मिळावी यासाठी वांद्रे न्यायालयात धाव घेतली आहे. संजय राऊत यांच्या विरोधात स्वप्ना पाटकर यांनी दिलेला जबाब माघारी घेण्यासाठी एका पत्रातून धमकी आली होती. याबाबत तपास करण्यासाठी पोलिसांनी वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयासमोर अर्ज दाखल केला आहे. त्यातच आज ईडीने संजय राऊत यांना ताब्यात घेतल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

स्वप्ना पाटकर धमकी प्रकरणात वाकोला पोलिसांकडून(Vakola police) तक्रार दाखल करून घेण्यात आली होती. सध्या संजय राऊत यांची ज्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणाची चौकशी सुरू आहे त्याच प्रकरणात स्वप्ना पाटकर यांचा जबाब ईडीने नोंदविला आहे. स्वप्ना पाटकर यांनी संजय राऊत यांच्या विरोधात दिलेला जबाब माघारी घेण्यासाठी त्या पत्रात धमकी आली होती. त्यानंतर याची सखोल माहिती पोलीस आयुक्तांना पूर्वीच देण्यात आली आहे, तर या प्रकरणात संजय राऊत हे मास्टरमाइंड असल्याचे स्वप्ना पाटकर यांनी म्हटले होते.
दरम्यान, पोलीस आयुक्तांनी याप्रकरणी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना याबाबत तपास करण्याचे निर्देश दिले होते. त्या पार्श्वूमीवर आता या प्रकरणात सखोल चौकशी करण्यासाठी न्यायालयासमोर(the court) हा अर्ज दाखल करण्यात आला आहे.