
Mumbai : सोनिया गांधींशी गैरवर्तन करणाऱ्या स्मृती इराणी यांनी माफी मागावी : संध्या सव्वालाखे

Indiagroundreport वार्ताहर
मुंबई : स्मृती इराणी यांनी सोनिया यांची माफी मागावी, अन्यथा रस्त्यावर फिरु देणार नाही, असा इशारा महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे(Sandhya Savvalakhe) यांनी आज दिला आहे. त्या म्हणाल्या की, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी हुज्जत घालत गैरवर्तन करणाऱ्या केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांनी मर्यादा ओलांडली आहे. देशासाठी दोन महान व्यक्तींचे बलिदान दिलेल्या गांधी कुटुंबातील सोनिया यांनी प्रधानमंत्रीपदाचाही त्याग करून राजकारणात एक आदर्श घालून दिलेला आहे. विरोध पक्षातील लोकांशीही त्या आदराने वागतात. अशा सोनिया यांच्याशी गैरवर्तन करून स्मृती इराणी यांनी त्यांची ‘संस्कृती’ दाखवून दिली आहे.

महिला काँग्रेसने प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीयमंत्री स्मृती इराणी(Smriti Irani) यांच्या डहाणू येथील निवासस्थानावर मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली. यावेळी त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.
संध्या सव्वालाखे पुढे म्हणाल्या की, स्मृती इराणी यांची १८ वर्षांची मुलगी गोव्यात अवैध बार चालविते. त्याविरोधात काँग्रेसने(Congress) जाब विचारल्याने स्मृती इराणी यांना झोंबले, त्याचा राग धरून त्यांनी सोनिया यांच्याशी संसद परिसरात हुज्जत घातली. सोनिया गांधी(Sonia Gandhi) या ७५ वर्षांच्या राजकीय श्रेत्रातील आदरणीय नेत्या आहेत. लोकशाहीत सरकारला जाब विचारण्याचा विरोधकांना संविधानाने हक्क दिला आहे, पण सरकारला कोंडीत पकडत असल्याने व स्मृती इराणींच्या मुलीचे अवैध कारनामे बाहेर काढल्याने स्मृती इराणी यांनी हे असभ्यवर्तन केले. आमच्या नेत्यांचा अपमान कराल तर सहन केले जाणार नाही, त्याला जशास तसे उत्तर देऊ.