
Mumbai : १ कोटी ६६ लाख ग्राहकांना स्मार्ट वीजमीटर

दीपक पवार
मुंबई : राज्यातील वीजवितरण यंत्रणा स्मार्ट करण्यासाठी तब्बल ३९ हजार ६०२ कोटींच्या सुधारीत वितरण क्षेत्र योजनेत महावितरणद्वारे १ कोटी ६६ लाख ग्राहकांना स्मार्ट वीजमीटर(smart electricity meters) बसविण्यात येणार आहेत. हे स्मार्ट वीजमीटर बसविल्यामुळे ग्राहकांना अचूक वीजबिल मिळणार असल्याने महावितरणची वितरणहानी कमी होऊन महसुलात वाढ होईल. परिणामी ग्राहकांना दर्जेदार व अखंडित वीजपुरवठा मिळेल, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी आज दिली आहे.
राज्यातील(state government) वीजवितरण यंत्रणा स्मार्ट करण्यासाठी तब्बल ३९ हजार ६०२ कोटींच्या सुधारित वितरण क्षेत्र योजनेला राज्य शासनाने नुकतीच मंजुरी दिली आहे. यापैकी ग्राहकांसोबतच वितरण रोहीत्रे आणि वीजवाहिन्यांचे स्मार्ट मीटरिंग करण्यासाठी ११ हजार १०५ कोटींची अंदाजित तरतूद करण्यात येणार आहे. यात सर्व वर्गवारीतील एकूण १ कोटी ६६ लाख ग्राहकांना, तसेच ४ लाख ७ हजार वितरण रोहीत्र, तर २७ हजार ८२६ वीज वाहिन्यांना स्मार्ट वीजमीटर बसविण्याचे या योजनेत प्रस्तावित करण्यात आले आहे.
राज्याचा झपाट्याने होणारा औद्योगिक विकास आणि त्यामुळे होणारे शहरीकरण लक्षात घेता भविष्यात विजेच्या मागणीचे योग्य नियोजन व्हावे‚ ग्राहकांना अपघातविरहित आणि दर्जेदार वीजपुरवठा मिळावा, यासाठी महावितरणद्वारे वीज यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी सुधारित वितरण क्षेत्र योजना राबविण्यात येणार आहे. यात ग्राहकांसाठी स्मार्ट प्रिपेड मीटरिंग(prepaid metering) सोबतच वाणिज्यिक, औद्योगिक व शासकीय ग्राहकांना स्मार्ट प्रिपेड मीटर बसविणे, वितरण रोहित्रे आणि वाहिन्यांना संवाद-योग्य व अत्याधुनिक मीटरिंग सुविधा प्रणालीसाठी सुसंगत मीटरिंग करण्यात येणार आहे. याशिवाय मीटर नसलेल्या वाहिन्यांचे मीटरिंग आणि विद्यमान मीटर ऑनलाईन करणे आदी कामांसाठी ११ हजार १०५ कोटींची तरतूद करण्यात आली असल्याचेही विजय सिंघल यांनी सांगितले.
वाणिज्यिक व तांत्रिकहानी २५ टक्क्यांपर्यंत असलेल्या अमृत शहराच्या विभागाव्यतिरिक्त ग्रामीण विभागातील १६ लाख ६० हजार ९४६ ग्राहकांना स्मार्ट वीजमीटर आणि या विभागातील २५ केव्हीए क्षमतेवरील बिगरशेतीसाठीची १ लाख ७६ हजार ६८७ वितरण रोहीत्रांचे स्मार्ट मीटरिंग करण्यात येणार, अशा एकूण १ कोटी ६६ लाख ग्राहकांना, तर ४ लाख ७ हजार वितरण रोहीत्रांना आणि २७ हजार ८२६ वीजवाहिन्यांना स्मार्ट वीजमीटर बसविणे प्रस्तावित असल्याचे देखील विजय सिंघल म्हणाले आहे.
या योजनेंतर्गत १५ टक्क्यांपेक्षा अधिक वाणिज्यिक व तांत्रिकहानी असलेल्या अमृत शहरांच्या विभागातील ३७ लाख ९५ हजार ४६६ ग्राहकांकडे हे स्मार्ट वीजमीटर बसविण्यात येतील. वाणिज्यिक व तांत्रिकहानी १५ टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या अमृत शहराच्या विभागाच्या व्यतिरिक्त इतर शहरी विभागातील २ लाख ६० हजार ४१७ ग्राहक, तर ग्रामीण भागातील २६ लाख ६७ हजार ७०३ स्मार्ट वीजमीटर बसविण्यात येतील. सर्व व्यावसायिक, औद्योगिक, शासकीय व उच्चदाब वीजवापर असलेले २६ लाख ९५ हजार ७१६ ग्राहकांकडे देखील हे स्मार्ट वीजमीटर बसविण्यात येणार आहेत.
तसेच या विभागांमधील २५ केव्हीए क्षमतेवरील बिगरशेतीसाठीची २ लाख ३० हजार ८२० वितरण रोहीत्रे आणि २७ हजार ८२६ वितरण वीजवाहिन्यांवर स्मार्ट वीजमीटर बसविण्याचे नियोजन केले आहे. ही सर्व कामे डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करावयाची आहे. याशिवाय मार्च २०२५ पर्यंत वाणिज्यिक(commercial) व तांत्रिकहानी १५ टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या अमृत शहरातील ५५ लाख ३८ हजार ५८५ वीजग्राहकांकडेही हे स्मार्ट वीजमीटर बसविले जातील.