
Mumbai: वीजबिल थकबाकी भरण्यासाठी सिद्धार्थ कॉलनी वासियांचा पुढाकार

मुकुंद लांडगे
मुंबई: (mumbai) चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीतील(Siddharth Colony) रहिवाशांवर तब्बल 100 कोटींपेक्षा अधिक वीजबिल थकबाकी असल्याच्या आरोपावरून अदानी इलेक्ट्रिक कंपनीने गेला आठवडाभर सतत पहाटे 5 ते सायंकाळी 5 पर्यंत वीज पुरवठा खंडित केला. त्यामुळे काल रहिवाशांनी सकाळी 10 वाजल्यापासून सायंकाळी उशिरापर्यंत शेकडो रहिवाशांनी पुन्हा मोर्चा काढला.
मात्र त्यानंतर आता रहिवाशांनी हे थकीत वीजबिल भरण्यासाठी पुढाकार घेतला असून, काही कार्यकर्ते रहिवाशांना तसे आवाहन करत आहेत. विकासक आणि रहिवासी यांच्या वादात वीजबिल थकीत झाल्याची माहिती कार्यकर्त्यांनी दिली आहे. येथे जवळपास 3 हजार 500 रहिवासी कुटुंबे असून, त्यातील 900 जणांनी वीजबिल भरली आहेत. तर सुमारे 700 जणांचे मिटर कापून नेण्यात आले आहेत. दुसरीकडे 36 जणांवर 1 लाखांपेक्षा अधिक वीजबिल असून, इतरांवर 50 हजारांच्या आत थकीत बिल आहे. या सर्वांनाच थकीत बिल भरण्यासाठी आम्ही आवाहन केले असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे वार्ड अध्यक्ष दिलीप लोखंडे यांनी दिली आहे.
दरम्यान, ज्या 700 जणांचे मिटर कापले आहेत त्यांच्याकडून थेट वीज वापरली जात आहे. त्यामुळे बिल भरणाऱ्यांवर थकीत बिलाचा भुर्दंड पडत असल्याचे लोखंडे यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या वसाहतीतील प्रत्येक रहिवाशांनी आपले थकीत बिल भरावे यासाठी ते अनेक कार्यकर्त्यांसह महिला कार्यकर्त्या विमल रत्ना, अतुल कटारे, आकाश तेलुरे यांच्यासोबत घरोघरी जाऊन थकबाकी भरण्याचे आवाहन रहिवाशांना करत आहेत या कार्यकर्त्यांनी सांगितले आहे.