
Mumbai : उध्दव ठाकरे यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याचे शरद पवार यांचे आदेश : जयंत पाटील

प्रशांत बारसिंग
मुंबई : (Mumbai) राज्यात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याचे आदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनी दिल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज दिली.
‘तो’ त्यांचा अंतर्गत प्रश्न
जयंत पाटील(Jayant Patil) म्हणाले की, आज आमची शरद पवार यांच्यासोबत बैठक झाली आणि गेल्या तीन दिवसात घडलेल्या राजकीय घटनेवर चर्चा झाली. यामध्ये आम्ही शिवसेनेसोबत राहणार आहोत. शिवसेनेत निर्माण झालेली परिस्थिती ही त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे.
आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठामपणे उभे आहोत, असा विश्वास जंयत पाटील यांनी पत्रकारांसमोर दिला. याचबरोबर सरकार पडल्यास विरोधी बाकावर बसण्यासाठी आमची तयारी आहे, असेही यावेळी जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

‘ते’ आमच्यासाठी अनपेक्षित
जयंत पाटील म्हणाले की, काल आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक घेतली. यामध्ये सर्वजण एकत्र राहण्याचे ठरले आहे. एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेले आमदार पुन्हा शिवसेनेत येतील. शिवसेना एकसंध राहण्यासाठी आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहण्यासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्न करीत आहे. दरम्यान, मुंबईतील गेलेले आमदार आमच्यासाठी अनपेक्षित आहेत. बंडखोरी करून गेलेले आमदार उद्धव ठाकरे यांच्यासमोर आल्यावर पुन्हा त्यांच्यासोबत राहतील, असा आम्हाला विश्वास आहे.
जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी ‘वर्षा’ बंगला सोडण्याच्या मुद्यावरही भाष्य केले. ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना आम्हीच वर्षा बंगल्यावर येण्याचा आग्रह केला होता. त्यात वेगळा अर्थ काढण्याची आवश्यकता नाही.