
Mumbai : संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे निधन

Indiagroundreport वार्ताहर
मुंबई : ‘संतूर’ या वाद्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रतिष्ठा मिळवून देणारे जगविख्यात पंडित शिवकुमार शर्मा(Pandit Shivkumar Sharma) यांचे निधन झाले आहे. आज १० मे रोजी सकाळी त्यांचे हृदयविकाराने निधन झाले. पंडित शिवकुमार हे ८४ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी मनोरमा आणि पुत्र राहुल शर्मा असा परिवार आहे.
भारतीय अभिजात संगीतात पं. शिवकुमार शर्मा यांचे योगदान अतुलनीय आहे. संतूर(Santoor) या काश्मीरमधील लोकवाद्याला अभिजात संगीताच्या दरबारात मानाचे स्थान मिळवून देणाऱ्या शिवकुमार यांनी भारतीय चित्रपट संगीतातही फार मोठी कामगिरी बजावली. ‘सिलसिला’ या चित्रपटाला बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्याबरोबर त्यांनी दिलेले संगीत रसिकांच्या सतत आठवणीत राहणारे ठरले आहे.
‘कॉल ऑफ द व्हॅली’ (Call of the Valley) ही त्यांची ध्वनिमुद्रिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. त्यामध्ये पं. हरिप्रसाद चौरसिया आणि गिटारवादक ब्रिजभूषण काबरा यांच्याबरोबर त्यांनी वादन केले होते. हरिप्रसाद चौरसिया यांच्याबरोबरची त्यांची जोडी खूप गाजली. ही जोडी ‘शीव-हरी’ या नावाने ओळखली जात असे. या जोडीने अनेक चित्रपटांना संगीतबध्द केले असून, यश चोप्रांचा ‘सिलसिला’ (१९८०) हा त्यांचा पहिला चित्रपट होता. त्यानंतर या जोडीने ‘फासले’ (१९८५), ‘चांदणी’ (१९८९), ‘लम्हे’ (१९९१), ‘डर’ (१९९३) या चित्रपटांना संगीत दिले आहे.