
Mumbai : ‘त्या’ दाम्पत्याच्या सुटकेचे आदेश जारी

बोरिवली दंडाधिकारी न्यायालयाचे आदेश
मुकुंद लांडगे
मुंबई : काल राणा दाम्पत्याच्या जामिनावर न्यायालयात सुनावणी झाली. त्याचवेळी त्यांना जामीन मंजूर करण्यात आला होता. मात्र, या आदेशाची प्रत आज तुरुंग प्रशासनाला मिळाली नव्हती. मात्र, आज ही प्रत मिळाल्यानंतर ११ दिवसांच्या काळानंतर या दाम्पत्याच्या सुटकेचे आदेश बोरिवली दंडाधिकारी न्यायालयाने दिले आहेत. रवी राणा हे तळोजा आणि नवनीत राणा(Navneet Rana) या भायखळा महिला कारागृहात होते.
किरीट सोमैय्या हे भेट घेणार
कारागृहातून सुटका झाल्यानंतर नवनीत राणा या दुपारी २ वाजता कारागृहातून बाहेर पडल्या. त्यानंतर त्या वैद्यकीय तपासणीसाठी लीलावती रुग्णालयातकडे रवाना झाल्या. यावेळी त्यांची बॉडी लँग्वेज ही पूर्वीसारखी आक्रमक नव्हती, तर नरमाईची दिसून आली. रवी राणा(Ravi Rana) यांचीही आता तळोजा तुरुंगातून सुटका करण्यात येत आहे. तुरुंगातून या दोघांची सुटका झाल्यानंतर त्यांची भाजप नेते किरीट सोमैय्या हे भेट घेणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. ते खार येथील निवासस्थानी त्यांची भेट घेणार आहेत.

करावे लागणार पाच अटींचे पालन
दरम्यान, नवनीत राणा आणि रवी राणा यांना जामीन देताना मुंबईच्या सत्र न्यायालयाकडून दोघांनाही काही अटी घालण्यात आल्या आहेत. राणा दाम्पत्याने त्यांच्यावर लावण्यात आलेल्या कलम १५३ ए आणि १२४ ए विरोधात जामिनासाठी अर्ज केला होता. आता जामिनावर सुटल्यानंतर त्यांना पाच अटींचे पालन करावे लागणार आहे. रवी राणा आणि नवनीत राणा यांना प्रसारमाध्यमांशी बोलण्यास मनाई असेल, तपासात कोणतेही अडथळे आणू नयेत, असे आदेश न्यायालयाने(The court) या अटीत दिले आहेत. तसेच या घटनेशी संबंधित असलेल्या साक्षीदारावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणू नये, त्यांना प्रलोभने दाखवून त्यांच्यावर प्रभाव टाकायचा नाही, अशीही एक अट न्यायालयाकडून घालण्यात आली आहे. राणा दाम्पत्याने अशा प्रकारच्या गुन्ह्यात पुन्हा सहभाग घ्यायचा नाही, असेही त्यांना सांगण्यात आले आहे. न्यायालयाने घातलेल्या या अटींचे पालन राणा दाम्पत्याला करावे लागणार आहे.