
Mumbai: जिल्हापरिषदेत १० हजार पदांची भरती

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती
आरोग्य विभागाशी संबंधित गट-क संवर्गातील पदे भरणार
प्रशांत बारसिंग
मुंबई : (mumbai) जिल्हापरिषदेतील(Zilla Parishad) आरोग्यसेवक, सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता आणि आरोग्य पर्यवेक्षक या पाच संवर्गातील एकूण १० हजार १२७ रिक्तपदांची भरतीप्रक्रिया राबविण्यात येत आहे. या पाच संवर्गातील पदे भरण्यासाठी मार्च २०१९ च्या जाहिरातीनुसार, अर्ज प्राप्त झालेले असून यासंदर्भातील भरतीप्रक्रिया जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या जिल्हा निवड समितीमार्फत करण्यात येत असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज गुरुवारी दिली.
राज्यातील सर्व जिल्हापरिषदांकडील गट-क संवर्गापैकी आरोग्यविभागाशी संबंधित पाच पदांची भरतीप्रक्रिया जिल्हा स्तरावरच घेण्याबाबतची प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याबाबत मुश्रीफ यांनी सर्व जिल्हापरिषदांना निर्देश दिले आहेत.
आरोग्य विभागाशी संबंधित आरोग्य पर्यवेक्षकाची ४७ पदे, औषध निर्मात्याची ३२४ पदे, प्रयोगशाळा तंत्रज्ञाची(Laboratory Technician) ९६ पदे, आरोग्यसेवक (पुरूष) याची ३ हजार १८४ पदे आणि आरोग्यसेविकांची ६ हजार ४७६ पदे अशी एकूण १० हजार १२७ रिक्तपदांची भरती करण्यात येणार आहे.
मार्च २०१९च्या जाहिरातीनुसार, या पाच संवर्गासाठी एकूण ४ लाख २ हजार १२ अर्ज प्राप्त झाले असून, या प्राप्त अर्जाद्वारे उमेदवारांची परीक्षेद्वारे निवडप्रक्रिया करण्यात येणार आहे, त्यामुळे ही भरतीप्रकिया आता तातडीने सुरू करण्याचे निर्देश मुश्रीफ यांनी दिले आहे.
आरोग्यविभागाशी संबंधित पाच संवर्ग वगळता इतर संवर्गातील पदांबाबत जिल्हापरिषद आणि जिल्हा पंचायत समितीसाठी मंजूर असलेल्या पदांचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यासाठी विभागीय आयुक्त स्तरावर आढावा घेण्यासंदर्भात ग्रामविकास मंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत त्यानुसार सुधारित आकृतीबंध अंतिम करून त्यास मान्यता मिळाल्यानंतर इतर संवर्गातील पदभरतीची कार्यवाही जिल्हा परिषदेमार्फत लवकरच करण्यात येणार असल्याचे हसन मुश्रीफ(Hasan Mushrif) यांनी सांगितले.