
Mumbai: कोणाची तक्रार करण्यासाठी राणा दाम्पत्य दिल्लीला रवाना?

त्यांनी नैतिकता शिकवू नये : नवनीत राणा
प्रशांत बारसिंग
मुंबई : (mumbai) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडत राणा दाम्पत्य त्यांच्या विरुध्द तक्रार करण्यासाठी आज दिल्लीकडे रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काहीच कामाचे नाहीत. त्यांनी आम्हाला 20 फूट गाडण्याची भाषा केली असल्याचा आरोप खासदार नवनीत राणा(Navneet Rana) यांनी केला आहे. मुंबई पोलिसांनी आमचा पोलीस ठाण्यात छळ केला असल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी केला असून, महाराष्ट्रात सुरू असलेल्या सूडाच्या कारवाईची माहिती लोकसभा अध्यक्षांसह गृहमंत्र्यांना देणार असल्याचे रवी राणा यांनी म्हटले आहे.
अमरावतीच्या(Amravati) खासदार नवनीत राणा यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. त्यानंतर आज अपेक्षेनुसार राणा दाम्पत्याने दिल्लीत धाव घेतली आहे. त्यापूर्वी राणा दाम्पत्याने आज माध्यमांशी संवाद साधला. नवनीत राणा यांनी म्हटले की, लोकप्रतिनिधींसोबत अशी वर्तवणूक होत असेल, तर सामान्य लोकांचे काय होत असेल? दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असून, तुरुंगात झालेल्या छळाची माहिती त्यांना देणार आहे. उद्धव ठाकरे यांनी आम्हाला नैतिकतेचे धडे शिकवू नये, असे नवनीत राणा म्हणाल्या आहेत.

आमदार रवी राणा(Ravi Rana) यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. एका महिलेला सरकारने अपमानास्पद वागणूक दिली असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारकडून आमच्यावर द्वेषातून कारवाई होत आहे. आम्हाला खार पोलीस ठाण्यात पोलिसांनी चहा दिला, त्यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी आम्ही तुम्हाला जामिनावर सोडू, असे सांगितले होते. मात्र, त्यानंतर आम्हाला सांताक्रूझ पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्याठिकाणी पहाटे पाच वाजेपर्यंत आम्हाला पाणीदेखील देण्यात आले नव्हते, असेही रवी राणा म्हणाले. मुंबईत माझा एकच फ्लॅट आहे. फ्लॅट पाहण्यासाठी त्यांनी रिकामटेकडे असलेले अनिल परब आणि संजय राऊत(Sanjay Raut) यांना पाठवावे, असा टोलाही राणा यांनी यावेळी लगावला.
दरम्यान, आम्ही कोर्टाच्या कोणत्याही अटींचे उल्लंघन केलेले नसल्याचा दावा राणा दाम्पत्याने केला आहे. आम्ही कोर्टाच्या आदेशाचे पालन करीत असून, त्यांनी दिलेल्या चौकटीत वक्तव्य करीत असल्याचा दावा त्यांनी केला. आम्ही हनुमान चालिसा, मातोश्री असा शब्ददेखील उच्चारला नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.