
Mumbai: राज ठाकरेंचा भाजपने केला टप्प्यात कार्यक्रम : महेश तपासे

प्रशांत बारसिंग
मुंबई : (mumbai) भाजपच्या खांद्यावर बसून हिंदुत्वाची झेप घेण्याचे स्वप्न पाहणार्या राज ठाकरेंना भाजपच्याच उत्तर प्रदेशातील(Uttar Pradesh) खासदाराने अयोध्येत येण्यास मज्जाव केला आहे. त्यामुळे भाजपनेच राज ठाकरेंचा टप्प्यात कार्यक्रम केला असल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्यप्रवक्ते महेश तपासे यांनी आज गुरुवारी लगावला आहे.
राज ठाकरे यांना अयोध्येत येण्यास मज्जाव
भाजपचे खासदार ब्रिज भूषण सिंग यांनी राज ठाकरे यांना अयोध्येत येण्यास मज्जाव केला आहे. पहिल्यांदा हिंदी भाषिकांची माफी मागा तरच अयोध्येत या, असे फर्मान काढले आहे. त्यामुळे शेवटी कर्माची फळं प्रत्येकाला तिथेच भोगावे लागतात, अशी टीकाही महेश तपासे यांनी केली आहे. राज ठाकरे यांची हिंदुत्वाची पतंग उडण्याअगोदरच भाजपकडून कन्नीकट करण्यात आली आहे. राज ठाकरेंनी जे कल्याण रेल्वेस्थानकावर(Kalyan railway station) उत्तर भारतीय विद्यार्थ्यांसोबत आणि मुंबईतील टॅक्सी चालकांबाबत केले त्याची फळे आज त्यांना अयोध्या दौऱ्याच्या निमित्ताने भोगावी लागत आहेत ही वस्तुस्थिती आहे, असेही महेश तपासे म्हणाले.

‘ती’ घोषणा म्हणजे राज ठाकरेंच्या जखमांवर मीठ चोळण्यासारखे
भाजप हा ‘युज अँड थ्रो’ यातत्त्वावर चालणारा एक महान पक्ष आहे. आपल्याला उपयोग असेपर्यंत वापर करायचा त्यानंतर केराची टोपली दाखवायची ही भाजपची जुनी रणनीती आहे. आज भोंग्याच्या विषयावर विश्व हिंदू परिषदेने हात झटकल्यानंतर अयोध्याचे खासदार ब्रिज भूषण सिंह यांची घोषणा म्हणजे राज ठाकरेंच्या जखमांवर मीठ चोळण्यासारखे आहे, असेही महेश तपासे(Mahesh Tapase) यांनी स्पष्ट केले.
ज्या योगींचे गुणगान राज ठाकरेंनी केले ते मुख्यमंत्री योगी उत्तर प्रदेशच्या जनतेच्या मनाविरुद्ध राज ठाकरेंना भेटतील का?, असा सवालही महेश तपासे यांनी उपस्थित केला आहे.
देवेंद्र फडणवीस सध्या ‘गजनी’तील आमीर खानसारखे
देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी केलेल्या काही वक्तव्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी ‘गजनी’ सिनेमातील ‘आमीर खान’ची उपमा देत भाजपला टोला लगावला. गजनी सिनेमात आमीर खान हा आपण कोण आहे हे विसरतो आणि डायरीत लिहून ठेवतो तसे आता देवेंद्र फडणवीस यांना लिहावे लागणार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.