
Mumbai : रेल्वेची ‘ती’ ४५ एकर जमीन महिनाभरात हस्तांतरित करणार : रेल्वेमंत्री

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी खासदार राहुल शेवाळे यांना दिले आश्वासन
१८ वर्षांपासून रखडला आहे धारावी पुनर्विकास प्रकल्प
दीपक पवार
मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी रेल्वेची ४५ एकर जमीन महिनाभरात हस्तांतरित करणार असल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव(Ashwini Vaishnav) यांनी म्हटले आहे. गेली अठरा वर्षांपासून धारावी पुनर्विकास प्रकल्प रखडला आहे. लोकप्रतिनिधी, रहिवाशी आणि प्रशासनाकडून केवळ मागणी आश्वासनाचा भडीमार सुरु असतानाच आता यामध्ये रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आणखी एका आश्वासनाची भर घातली आहे. धारावी प्रकल्पासाठी आवश्यक असलेली रेल्वेची ४५ एकर जमीन राज्य सरकारला महिनाभरात हस्तांतरित करण्यात येईल, असे आश्वासन रेल्वेमंत्र्यांनी दिले असल्याने या प्रकल्पाला गती मिळण्याची शक्यता आहे.
या प्रकल्पासाठी धारावी अधिसूचित क्षेत्राशेजारील रेल्वेची ९० पैकी ४५ एकर जमीन राज्य सरकारने रेल्वे मंत्रालयाकडून खरेदीने अधिग्रहित केली आहे. या जमिनीची रक्कमही सरकारने रेल्वेला जमा केली आहे. त्यानंतरही केंद्र सरकारने राज्याकडे जमीन हस्तांतरित केली नव्हती, यामुळे निविदा काढण्यात अडचण निर्माण झाली आहे. या प्रश्नी खासदार राहुल शेवाळे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन ४५ एकर जमीन राज्य सरकारला हस्तांतरित करण्याची मागणी केली. यावर रेल्वेमंत्र्यांनी एका महिन्यात राज्य सरकारला संबंधित जमीन हस्तांतरित केली जाईल, अशी ग्वाही दिली आहे.
धारावीतील जनतेचे जीवनमान उंचाविण्यासाठी राज्य सरकारने(state government) २००४ मध्ये धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा अध्यादेश शासन निर्णय काढला. तेव्हापासून धारावी प्रकल्पाकरिता अनेकदा जागतिक स्तरावर निविदा काढण्यात आल्या. मात्र, त्या पूर्णत्वास जावू शकल्या नाहीत. खासदार राहुल शेवाळे यांना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आश्वासन दिल्याने धारावी प्रकल्पाला गती मिळण्याची शक्यता वाढली आहे.
१८ वर्षांहून अधिककाळ हा प्रकल्प रखडला आहे. २८ नोव्हेंबर २०१८ रोजी काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत यशस्वी झालेल्या सेकलिंक कंपनीला ७ फेब्रुवारी २०१९ रोजी यशस्वी निविदाकाराला देकार पत्र मिळणे आवश्यक होते. मात्र, यशस्वी निविदाकाराला देकारपत्र देण्याऐवजी पुन्हा नव्याने निविदा(fresh tender) काढण्याचा निर्णय महाधिवक्त्यांनी घेतला.