
Mumbai: राणा दाम्पत्यावर पोलिसांनी अभ्यास करून गुन्हा नोंदवला : वळसे पाटील यांची माहिती

मुकुंद लांडगे
मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा(Navneet Rana) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा(Ravi Rana) यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणे चुकीचे असल्याचे निरीक्षण मुंबई सत्र न्यायालयाने नोंदवले आहे. त्या पार्श्वूमीवर पोलिसांनी अभ्यास करूनच हा गुन्हा नोंदवला आहे अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील(Dilip Walse Patil) यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली. या दोघांना गुरूवारी (४ मे) सेशन कोर्टाकडून जामीन देण्यात आला त्याचवेळी न्यायालयाने हे मत नोंदवले होते.
कोणतेही निरीक्षण नोंदवणे आणि काय टिप्पणी करायची याचा अधिकार न्यायालयाचा आहे. मात्र हा गुन्हा नोंदवताना पोलिसांनी अभ्यास करूनच राजद्रोहाचा गुन्हा नोंदवला आहे असे वळसे पाटील(Dilip Walse Patil) यावेळी म्हणाले आहेत. सत्र न्यायालयाने या दोघांच्या विरोधात लावलेले राजद्रोहाचे कलम चुकीचे आहे. मात्र राणा दाम्पत्याने राज्यघटनेत दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची सीमा ओलांडली आहे असेही मत व्यक्त बुधवारी न्यायालयाने व्यक्त केले. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या ‘मातोश्री’ या घराबाहेर हनुमान चालीसा पठण करणार असे आव्हान राणा दाम्पत्याने दिले होते. त्यावर मुंबई पोलिसांनी नोटीस देऊनही ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आहेत. इतकेच नाही तर राणा दाम्पत्याच्या वक्तव्यामुळे दोन धर्मात तेढ निर्माण झाली. त्यांनी सरकारी व्यवस्थेलाच आव्हान दिले,’ या आरोपांतर्गत मुंबई पोलिसांनी त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता. त्याबाबत आज वळसे पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे.