
Mumbai : देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्याबाहेरील पोलीस सुरक्षा वाढविली

राजा आदाटे
मुंबई : विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील(Nagpur) बंगल्यासमोरील पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
राज्यभरातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. राज्यात ठिकठिकाणी शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरू केली आहे. यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील बंगल्यासमोरील पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आल्याचे दिसून येत आहे. तर भाजपकडून सत्तास्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या असल्याचीही चर्चा आहे.
भाजपकडून एकनाथ शिंदे गटाला मोठी ऑफर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) हे लवकरच राजीनामा देतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. ही बातमी समजताच राज्यभरातील शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरु केली. यावेळी शिवसैनिक भावूक देखील झाल्याचे बघायला मिळाले. एकनाथ शिंदे गटाला मोठी ऑफर मिळाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. राज्यात 8 कॅबिनेट मंत्रिपदे, तर केंद्रात 2 मंत्रिपदे देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपकडून ही ऑफर दिली गेल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील शिवसैनिक आणखीच आक्रमक झाले आहेत. हीच बाब लक्षात घेता आता कुठलाही अनूचित प्रकार घडू नये, म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील बंगल्याबाहेरील सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
सत्ता स्थापनेसाठी भाजपच्या हालचाली
महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी 144 हा स्पष्ट बहुमताचा आकडा आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचे समर्थक 50 आमदार आणि भाजपचे समर्थक 114 आमदार असे मिळून 164 आमदारांचे बहुमत(majority) विधानसभेत सिद्ध करून राज्यात भाजप+शिवसेना(एकनाथ शिंदे गट) असे सरकार स्थापन करण्यासाठी राजकीय घडामोडी सुरू झाल्याचे समजते. शिवसेनेने शेवटच्या क्षणी बाजी लावली, तर भाजप आणि एकनाथ शिंदे यांचा ‘प्लॅन बी’ तयार आहे. त्यामुळे भाजप कोणताही धोका पत्करण्यास तयार नाही.
फ्लोअर टेस्टमध्ये आमदार पलटण्याची भीती
या बंडखोर आमदारांना फ्लोअर टेस्टसाठी मुंबईत आणले, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भीतीने यापैकी काही आमदार फुटण्याची शक्यता आहे, अशी भीती भाजप आणि एकनाथ शिंदे यांना आहे. मेघालयाचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा हे गुवाहाटीमधील हॉटेल रेडिसन ब्लूमध्ये दाखल झाले होते. त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. कॉनराड संगमा(Conrad Sangma) हे नॅशनल पीपल्स पार्टीचे प्रमुख आहेत. तसेच संगमा हे भाजप समर्थकही आहेत. भाजपनेच या मुख्यमंत्र्यांना चर्चेसाठी पाठविले का?, असा प्रश्न यामुळे उपस्थित केला जात आहे.