
Mumbai: पोलीस शोधत आहेत बारमधील ‘त्या’ बनावट नोटा

कर्नाटकातील बनावट नोटा मुंबईत
मुकुंद लांडगे
मुंबई: (mumbai) कर्नाटकमध्ये(Karnataka) बनावट नोटांची छपाई करून त्या मुंबईतील बारमध्ये खपविण्यात येत असल्याची माहिती उघड झाल्याने अशा नोटांचा शोध पोलीस घेत असल्याचे सांगण्यात आले. अशा बनावट नोटा मुंबईत खपविणाऱ्या एका कर्नाटक- मुंबईतील सक्रीय टोळीला दादर पोलिसांनी अटक केली आहे.
या कर्नाटक टोळीतील ४ जणांना अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून दादरमधील(Dadar) बारमध्ये एकजण बनावट नोटा खपवून दारू विकत घेत होता. ही माहिती पोलिसांना समजताच पोलीस अधिकारी रामकृष्ण सागडे, अंमलदार संतोष पाटणे, अजित महाडिक, महेश कोलते, गणेश माने, राजेंद्र रावराणे आणि आंधळे यांनी पाळत ठेवली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश मुगूटराव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने गेल्या १४ जुलै रोजी परेल एसटी डेपोसमोरून बनावट नोटा बाळगणारा आनंदकुमार रचना ममदापूर याला ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याच्या घरी छापा टाकून ४२ हजारांच्या बनावट नोटा ताब्यात घेण्यात आल्या. त्यानंतर गुन्हा नोंदवून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला होता. त्यातून बरीचशी माहिती समोर आली होती.

आनंदकुमार याने पोलिसांना दिलेल्या माहितीत तो मूळचा कर्नाटकचा आहे. त्याने या नोटा कर्नाटकमधील हुमनाबाद(Humanabad) येथील शिवकुमार शंकरकडून घेतल्या असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांचे हे पथक कर्नाटकला गेले. तेथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा लावून शिवकुमार याच्यासह किरण अरुण कांबळे याला ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडूनही तेथे २० हजार रुपयांच्या बनावट नोटा ताब्यात घेत तपास सुरू केला. त्यात या दोघांनी दहिसरच्या आकाश तडोलगी याला १०० आणि २०० रुपयांच्या बनावट नोटा दिल्याचे सांगितले. त्यानुसार, त्यालाही दादर पोलिसांनी गेल्या २६ जुलै रोजी अटक केली.
दरम्यान, पोलिसांनी(police) तपास केल्यानंतर जी माहिती हाती आली त्यात किरण कांबळे हा मुख्यसूत्रधार असून, तो कर्नाटकमध्ये राहत्याघरातूनच या बनावट नोटांची छपाई करीत असल्याचे उघड झाले. मुंबईसह राज्यातील इतर ठिकाणी, तसेच वेगवेगळ्या गर्दीच्या ठिकाणी त्याने बनावट नोटा चलनात आणल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी त्याच्या घरातून बनावट नोटा छपाईसाठी वापरण्यात येणारे एक कलर प्रिंटर, पेपर कटर, साधे कटर, स्टीलची पट्टी, शाईच्या बाटल्या, नोट छपाईसाठी लागणारा कागद, हिरव्या रंगाचा टेप हे साहित्य जप्त केल्याचे सांगण्यात आले. किरण कांबळेने यूट्युबवरून या बनावट नोटा बनविण्याचे प्रशिक्षण घेतले आहे, तर किरण अरुण कांबळे हा एक लाख रुपयांच्या बनावट नोटा ३० हजारांत टक्केवारीवर देत होता, असेही माहितीत पुढे आले आहे.
पोलिसांची बारमधील अशा बनावट नोटा शोधण्याची, तसेच आरोपीचे मुंबईत आणखी साथीदार आहेत काय? ही मोहीम(The campaign) सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. दारूविक्री दुकाने व बार आणि गर्दीच्या ठिकाणी आतापर्यंत या चार आरोपींकडून पोलिसांनी ६८ हजार ६०० रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत केल्या आहेत.