
Mumbai: गोदी कामगारांना थकबाकी त्वरित द्या !

कामगार संघटनांची मागणी
मुकुंद लांडगे
मुंबई – भारतातील प्रमुख बंदरांतील बंदर व गोदी कामगारांसाठी 1जानेवारी 2017 पासून लागू होणारा वेतन करार हा 31ऑगस्ट 2018 रोजी झाला आहे. त्यातील मुंबई बंदरातील कामगारांना 20 टक्के थकबाकी दिली आहे. तर 80 टक्के थकबाकी मिळाली नाही. त्यामुळे मुंबई पोर्ट प्रशासनाने गोदी कामगारांची व पेन्शनर्सची उर्वरित थकबाकी ताबडतोब द्यावी अशी मागणी ज्येष्ठ कामगारनेते ऍड. एस. के. शेट्ये(Adv. S. K. Shetty) यांनी केली आहे.
मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक(Mumbai Port Trust Dock) अँड जनरल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने काल माझगाव येथील कामगार सदन सभागृहात युनियनचा १०३ वर्धापन दिन साजरा करण्यात आला.त्यावेळी ही मागणी करण्यात आली. यावेळी दिवंगत कमगरणेते डॉ. शांती पटेल(Shanti Patel), अशोक मेहता व इतर कामगार नेत्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आले. याप्रसंगी ऍड. एस. के. शेट्ये म्हणाले की, कामगार भरती होत नसल्याने सध्याच्या कामगारांवर कामाचा बोजा जास्त पडतो. कोरोना काळात मुंबई पोर्टच्या कामगारांनी जीव धोक्यात घालून कमी कामगारांमध्ये काम करून मुंबई पोर्टची उत्पादकता वाढविली आहे. कामगार चळवळीला येणारा काळ आव्हानात्मक असून, त्याविरुद्ध एकजुटीने लढा देण्याची गरज आहे. तर मुंबई पोर्ट ट्रस्टचे माजी विश्वस्त आणि युनियनचे जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज म्हणाले की, भारतात प्रमुख बंदरात पूर्वी साडेतीन लाख गोदी कामगार होते. आज ही संख्या केवळ 20,000 इतकी आहे.
मुंबई बंदरात पूर्वी 42,000 कामगार होते, आज 4,000 कामगार शिल्लक राहिले आहेत. पेन्शनर्स 36,000 आहेत. मुंबई बंदराकडे 1,800 एकर जमीन आहे, त्यामुळे मुंबई बंदराच्या विकासातून जे उत्पन्न मिळेल ते एलआयसीकडे असलेल्या राखीव फंडात ठेवले तर गोदी कामगारांना शेवटपर्यंत पेन्शन मिळू शकते.
युनियनची मागणी –
वडाळा येथील पोर्ट ट्रस्ट हॉस्पिटल डी. वाय. पाटीलने बांधण्यासाठी 693 कोटीचा प्रकल्प असून, १० एकर जमीन मुंबई पोर्ट ट्रस्टने डी.वाय. पाटील यांना दिली आहे, मात्र डी वाय पाटील यांची मुंबई पोर्टला पैसे देण्याची आर्थिक क्षमता नसल्यामुळे आम्ही दोन्ही युनियनने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्या करारातील अटी पूर्ण केल्याशिवाय डी वाय पाटील यांना हॉस्पिटलचा ताबा देऊ नये, अशी मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन व ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनची स्पष्ट भूमिका आहे. यावेळी युनियनचे पदाधिकारी डॉ. यतीन पटेल, विद्याधर राणे, दत्ता खेसे, विकास नलावडे(Yatin Patel, Vidyadhar Rane, Datta Khese, Vikas Nalawade) व माजी उपाध्यक्ष विठोबा पवार यांची भाषणे झाली. सभेला युनियनचे पदाधिकारी अहमद काझी, मनीष पाटील, संदीप चेरफळे, पुंडलिक तारी, मारुती विश्वासराव, बाळकृष्ण लोहोटे उपस्थित होते.