
Mumbai : कोरोनामुळे राज्यपाल रुग्णालयात दाखल

Indiagroundreport वार्ताहर
मुंबई : (Mumbai) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी(Governor Bhagat Singh Koshyari) यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. यामुळे राज्यात सत्तांतर, एकनाथ शिंदे राज्यपाल भेट आणि तदानुषंगिक घडामोडींना तूर्तास तरी स्वल्पविराम मिळाला आहे. महाराष्ट्रात शिवसेना नेते, मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाचा पवित्रा घेतल्याने गेल्या ४८ तासांत नाट्यमयरित्या वेगाने राजकीय घडामोडी घडत आहेत. त्यामुळे राज्यात सत्तांतर घडणार का? ठाकरे सरकार जाऊन भाजपप्रणित सरकार पुन्हा सत्तेवर येणार का? अशा बातम्यांनी राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे.
मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात दाखल
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह(positive) आला आहे, त्यामुळे त्यांना मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. येथे त्यांच्यावर कोरोनासंदर्भातील उपचार करण्यात येणार आहेत.
काही दिवस आयसोलेशनमध्ये
राजभवनाकडून(Raj Bhavan) मिळालेल्या माहितीनुसार, राज्यपालांना आज, बुधवारी सकाळी ९:१५ वाजण्याच्या सुमारास गिरगाव येथील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान राज्यपालांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, कोरोनाच्या संसर्गामुळे त्यांना काही दिवस आयसोलेशनमध्ये राहावे लागणार आहे.