
Mumbai: शिंदे गटाला पहिला धक्का!

विधानसभा उपाध्यक्षानकदून अजय चौधरींच्या नियुक्तीला मान्यता
प्रशांत बारसिंग
मुंबई: (Mumbai) विधानसभेतील शिवसेनेचे गटनेते म्हणून अजय चौधरी यांच्या नियुक्तीला विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ(Narhari Jirwal) यांनी अखेर मान्यता दिली आहे. त्यामुळे शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाला पहिला धक्का बसला आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंद केल्यापासून राज्यातील सत्तासंघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी(Mahavikas Aghadi) सरकारचे अस्तित्व धोक्यात आले आहे. एकीकडे सरकार टिकवण्यासाठी सत्ताधाऱ्यांमध्ये खलबते सुरु आहेत. तर दुसरीकडे पक्ष वाचवण्यासाठी शिवसेनेची धडपड सुरु झाली आहे. शिंदे यांच्या बंडात भाजपचा हात असल्याचे आरोपही सत्ताधाऱ्यांकडून केले जात आहेत. तब्बल चार दिवसांपासून सुरु असलेले हे बंड आता कोर्टात जाण्याची शक्यता आहे.
शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेने कारवाई करत एकनाथ शिंदे यांची पक्षाच्या गटनेते पदावरुन उचलबांगडी करत शिवसेना विधीमंडळ गटनेता पदावर शिवडी विधानसभेचे आमदार अजय चौधरी(Ajay Chaudhary) यांची नियुक्ती केली. यावर आक्षेप घेत एकनाथ शिंदेंच गटनेते असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर अनेक दावे-प्रतिदावे केले जात होते. अशातच आता शिवसेना विधीमंडळ गटनेता पदावर अजय चौधरी तर प्रतोद पदावर सुनिल प्रभू यांना विधीमंडळाने मान्यता दिल्याचे पत्र विधिमंडळाने जारी केले आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी मान्यता दिल्याचेही पत्रात म्हटले आहे. त्यामुळे आता शिंदे गटाला न्यायालयात दाद मागावी लागणार आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या भूमिकेकडे राज्याचे लक्ष लागले दोन दिवसापूर्वी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी पत्रकार परिषद घेत काही गोष्टी स्पष्ट केल्या होत्या. कायद्यानुसार, पक्षप्रमुखाने गटनेता नेमायचा असतो असे झिरवाळ यांनी स्पष्ट केले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार शिवसेनेचे पक्ष प्रमुख म्हणून उध्दव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी गट नेता नेमायचा असतो. तसेच पक्ष प्रमुखानीच प्रतोदांची नेमणूक करायची असते. मुख्यमंत्र्यांनी अजय चौधरींची नेमणूक गटनेतेपदी केली आहे. ते पत्र मी स्वीकारले आहे, असे झिरवाळ यांनी म्हटले होते. या. अनुषंगाने विधानसभा उपाध्यक्ष यांनी अजय चौधरी यांची नियुक्ती मान्य केली असून हा शिंदे यांना पहिला धक्का असल्याचे मानण्यात येते.
अजय चौधरी कोण आहेत ?
अजय चौधरी हे शिवसेनेचे शिवडी विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. 2019 मध्ये विधानसभा मतदारसंघातून अजय चौधरी 40 हजार मताधिक्क्याने विजयी झाले होते. त्यांनी मनसेचे उमेदवार संतोष नलावडे यांचा दारुण पराभव केला होता. चौधरी हे परळ येथे वास्तव्यास आहेत. अजय चौधरी हे कट्टर शिवसैनिक आहेत. त्यांच्या माध्यमातून पक्षावर ठाकरे कुटुंबाचीच मांड कायम राहावी यासाठी उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला आहे.