
Mumbai : विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय वसतिगृहास राजर्षी शाहू महाराज यांचे नाव देण्याची मागणी

विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींनी दिले कुलगुरू सुहास पेडणेकर यांना निवेदन
लोकशाहीर कॉ. अण्णाभाऊ साठे यांचा जयंतीनिमित्त विद्यार्थांनी केला शाहिरी जलसा
दीपक पवार
मुंबई : मुंबई विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय वसतिगृहाला राजर्षी शाहू महाराज(Rajarshi Shahu Maharaj) यांचे नाव नाकारून राज्यपाल यांच्या शिफारशीनुसार विनायक दामोदर सावरकर यांचे नाव देण्याचे विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळाने निर्णय घेतला आहे. या निर्णायास मुंबईतील पुरोगामी विद्यार्थी संघटनांनी विरोध दर्शविला आहे.
लोकशाहीर कॉ. अण्णाभाऊ साठे(Annabhau Sathe) यांचा जयंतीनिमित्त मुंबईतील पुरोगामी विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधी मंडळाने मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांना निवेदन दिले. आंतरराष्ट्रीय वसतिगृहास राजर्षी शाहू महाराज यांचे नाव देण्याची आग्रही मागणी यावेळी या संघटनांनी केली.

मुंबई विद्यापीठाचे(Mumbai University) कुलगुरू सुहास पेडणेकर यांची संघटनांचे प्रतिनिधी सुबोध मोरे, रोहित ढाले, सचिन बनसोडे, विकास पाटेकर, प्रवीण मांजळकर, अमीर काजी, शंतनु, मनोज तापलं, विकास मोरे, सिद्धार्थ साठे यांनी नामांतराच्या प्रश्नावर भूमिका मांडली. शाहू महाराजांचे शिक्षण क्षेत्रातील कार्य दैदिप्यमान आहे, असे सर्व विद्यार्थी संघटनेने स्पष्ट केले. महाराजांनी १८९६ साली वसतिगृहाची सुरूवात केली, तेवढ्यावरच न थांबता त्यांनी अक्षरश: शेकडो शाळा आणि वसतिगृहांची स्थापना केली. २४ नोव्हेंबर १९११ साली त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा आदेश काढला. मुलींना मोफत उच्च शिक्षणाची सुरूवात केली. या सर्व शिक्षणाबरोबर महाराजांनी प्रौढ शिक्षण देखील सुरू केले. त्यांनी आपल्या संस्थानात शिक्षणासाठी हरतर्हेचे प्रयत्न केले. संस्थानातील दीन-दलित-सर्वसामान्य-गोरगरीब-बहुजन-अल्पजन या सगळ्यांना महाराजांनी त्यांच्या कुवतीनुसार, क्षमतेनुसार मिळेल तेथे संधी निर्माण करून महात्मा फुले व तत्कालीन समाज सुधारकांचा वारसा पुढे नेण्याचे बहुमूल्य कार्य केले, अशी भूमिका एसएफआय, सत्यशोधक विद्यार्थी संघटना, एआयएसएफआय, छात्रभारती-राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना-रिपब्लिकन सेना या विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांचा समोर मांडली. शिक्षण क्षेत्रातील कार्याचा जरासाही संबंध नसणाऱ्या व स्वातंत्र्य आंदोलनात ब्रिटिशांकडे माफीनामा देऊन बाहेर पडणारे वि. दा. सावरकर यांचे नाव विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय वसतिगृहाला देणे उचित ठरणारे नाही, असे संघटनांनी स्पष्ट केले. मुंबई विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय वसतिगृहाला राजर्षी शाहू महाराज यांचेच नाव देण्यात यावे, अशी आग्रही मागणी सर्वच समविचारी संघटनांनी केली, असे एसएफआयचे प्रवीण मंजाळकर यांनी सांगतिले.
तसेच मुंबई विद्यापीठात सत्यशोधक विद्यार्थी संघटना महाराष्ट्र आणि इतर समविचारी संघटनाच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन सभा आयोजित करण्यात आली होती. सत्यशोधकचे शाहीर तुषार सूर्यवंशी यांनी ‘शोषितांचा अण्णाभाऊ लाल सलाम’ हे गीत सादर केले, तर नाटककार संदेश गायकवाड यांनी ‘जग बदल घालुनी घाव’ सह शाहीर सुरेंद्र बर्वे आदी शाहिरांनी जलसा केला. कार्यक्रमाचे संचालन सत्यशोधकचे विकास मोरे यांनी केले.