
MUMBAI: 215 यशस्वी गिरणी कामगार/ वारसांना कागदपत्रे सादर करण्यासाठी 8 सप्टेंबरपर्यंत अंतिम मुदतवाढ

दीपक पवार
मुंबई: (MUMBAI) मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे 1 मार्च 2020 रोजी जाहीर करण्यात आलेल्या गिरणी कामगार सदनिका लॉटरीतील 215 यशस्वी गिरणी कामगार/ वारस यांना मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी 8 सप्टेंबर 2022 पर्यंत 30 दिवसांची अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. पात्रतेसाठी आवश्यक कागदपत्रे बँकेमध्ये सादर न करणाऱ्या सोडतीतील 215 यशस्वी गिरणी कामगार/वारसांची यादी म्हाडाच्या (MHADA) https://mhada.gov.in या संकेतस्थळावर ८ जुलै २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात आली. मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी सर्व संबंधित यशस्वी गिरणी कामगार/ वारस यांना आवाहन केले आहे की, या गिरणी कामगार/ वारसांना पात्रता निश्चितीकरिता बँकेमध्ये कागदपत्रे सादर करण्याची ही शेवटची संधी आहे तसेच मंडळातर्फे यासंदर्भात यापुढे कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. गिरणीच्या जमिनीवरील चाळीमध्ये घर / खोली नावे असणाऱ्या गिरणी कामगार / वारसांनी बँकेमध्ये कागदपत्रे सादर करू नये, असेही आवाहन. म्हसे यांनी केले आहे.
मुंबई मंडळातर्फे गिरणी कामगार / वारसांसाठी बॉम्बे डाईंग मिल, बॉम्बे डाईंग स्प्रिंग मिल व श्रीनिवास मिलच्या जागांवर उभारण्यात आलेल्या ३ हजार ८९४ सदनिकांची संगणकीय सोडत १ मार्च २०२० रोजी काढण्यात आली. प्रचलित प्रणालीनुसार सोडतीतील यशस्वी गिरणी कामगार/ वारस यांनी अर्जात नमूद केलेल्या पत्त्यावर मंडळातर्फे प्रथम सूचना पत्र (First Intimation Letter) पोस्टाद्वारे पाठवण्यात आली. या सूचना पत्रामध्ये नमूद कागदपत्रे अर्जदारांनी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुंबई स्थित शाखांमध्ये सादर करण्यासाठी १२ जुलै, २०२१ ते ०९ सप्टेंबर, २०२१ पर्यंत ६० दिवसांचा कालावधी देण्यात आला.
मात्र या कालावधीत अर्जदारांचा मिळालेला अल्प प्रतिसाद विचारात घेता मंडळाने कागदपत्रे सादर करण्यासाठी दुसऱ्यांदा दिनांक १० सप्टेंबर २०२१ ते दिनांक ०९ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत ३० दिवसांची तर तिसऱ्यांदा. १५ नोव्हेंबर २०२१ ते ३० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत १५ दिवसांची अशी एकूण १०५ दिवसांची मुदतवाढ कागदपत्रे सादर करण्यासाठी आतापर्यंत दिली आहे. मुंबई मंडळातर्फे यशस्वी गिरणी कामगार/ वारस यांना पाठविलेली प्रथम सुचना पत्र विविध कारणांमुळे पोस्टाकडून मुंबई मंडळाच्या कार्यालयात परत आली आहेत.
मात्र मुदतवाढ देऊनही अर्जदारांनी या कार्यालयाशी संपर्क न साधला नसून २१५ पैकी ८३ यशस्वी गिरणी कामगार / वारस प्रथम सूचना पत्रही घेऊन गेलेले नाहीत. सदर सूचना पत्रे मुंबईतील वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयातील उपमुख्य अधिकारी, गिरणी कामगार कक्ष, मुंबई मंडळ, कक्ष क्रमांक २०५, पहिला मजला या कार्यालयात उपलब्ध असून सर्व संबंधित यशस्वी अर्जदारांनी आपली प्रथम सूचना पत्र लेखी पुरावा, पासपोर्ट फोटो व ओळखपत्रासह प्रत्यक्ष संपर्क साधून घेऊन जावीत व पात्रता निश्चितीकरिता कागदपत्रे मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुंबईस्थित शाखांमध्ये ८ सप्टेंबर २०२२ पूर्वी सादर करावीत, असे आवाहन मुंबई मंडळातर्फे करण्यात आले आहे.