
Mumbai : बोरिवली रेल्वे स्थानकात काँग्रेसचे ‘रेल रोको’ आंदोलन

मुकुंद लांडगे
मुंबई : (Mumbai) आज काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक होत त्यांनी बोरिवली रेल्वे स्थानकात ‘रेल रोको’ आंदोलन केले. यावेळी बोरिवली स्थानकात(Borivali railway station) सौराष्ट्र एक्स्प्रेस रोखण्यात आली. मात्र, पोलिसांकडून आंदोलकांना रुळावरून हटविण्याचा प्रयत्न करण्यात आला, तरीही काही कार्यकर्ते हातात काँग्रेसचे झेंडे घेऊन रेल्वे स्थानकात दाखल होत होते.
बोरिवली येथे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत थेट रेल्वे रुळावर(railway track) ठिय्या मांडला. काहींनी रेल्वे रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे.

केंद्र सरकार जाणूनबुजून काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची ईडी चौकशी करीत असल्याच्या आरोपावरून या प्रकाराला विरोध दर्शविण्यासाठी सध्या मुंबईभर काँग्रेसकडून(Congress) आंदोलन सुरु आहे.
दरम्यान, नॅशनल हेरॉल्डप्रकरणी(National Herald case) सध्या सोनिया गांधी यांना ईडीकडून तिसऱ्यांदा चौकशीसाठी समन्स पाठविण्यात आले आहे. त्यांना आजारपणातही वारंवार चौकशीसाठी बोलावण्यात येऊन त्यांचा छळ केला जात असल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे, त्यामुळे हे आंदोलन करण्यात आल्याचे सांगण्यात आले.