
Mumbai : एकनाथ शिंदेंचे आव्हान मुख्यमंत्र्यांनी स्वीकारले!

महाविकास आघाडीची “वेट अँड वॉच” भूमिका
प्रशांत बारसिंग
मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचे आव्हान मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज स्वीकारले. शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असेल, तर मुख्यमंत्री पदावरून मी पायउतार होण्यास आपण तयार आहोत, अशा शब्दात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची कोंडी केली. दुसरीकडे शिंदे यांच्यासोबत गेलेले आमदार महाराष्ट्रात येण्यापर्यंत ‘वेट अँड वॉच’ची भूमिका महाविकास आघाडीने स्वीकारून राज्यातील घडामोडींवर सस्पेन्स कायम ठेवला.
एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांसह आसामच्या गुवाहाटी येथे आहेत. माझ्यासोबत ४० हून अधिक आमदार असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या तावडीतून सुटून काही आमदार राज्यात परतले असून, तेथील आणखी आमदार जबरदस्तीने कोंडून ठेवल्याचा आरोप सुटका झालेले आमदार करीत आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासोबत नक्की किती आणि कोण आमदार आहेत याचे चित्र स्पष्ट होत नसल्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि एकूणच महाविकास आघाडीच्या बड्या नेत्यांनी वेट अँड वॉच भूमिका स्वीकारल्याचे समजते. यासाठीच शरद पवार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची आज सायंकाळी ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेऊन पुढील रणनीतीवर चर्चा केल्याचे समजते.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांपैकी अनेक आमदार परत येण्याचे संकेत आहेत, तसेच विश्वासदर्शक ठरावाच्या वेळीही अनेक घडामोडी होणार असल्याने आगामी काही दिवसात एकनाथ शिंदे यांची कोंडी करण्यावर महविकास आघाडीचा भर राहील, असे समजण्यात येत आहे.
…पण मुख्यमंत्री शिवसेनेचाच झाला पाहिजे!
उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाला लायक नाही, असे स्पष्टपणे तोंडावर येऊन सांगा. मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देईन. एक जरी शिवसैनिक बोलला की, मी शिवसेना पक्षप्रमुख म्हणून काम करायला योग्य नाही, तर पक्षप्रमुखपदाचाही मी राजीनामा देईन. मात्र, पुढील मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच झाला पाहिजे, अशी अट ठेवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी शिवसेनेच्या बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे यांची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न केला. मी पळून जाणारा नाही. जी जबाबदारी आली ती जिद्दीने पार पाडली. बाळासाहेबांना जे वचन दिले होते ते पूर्ण करण्यासाठी रणांगणात उतरलो आहे, असे सांगताना उद्धव ठाकरे यांनी पक्षातील बंडखोरांचे आव्हान स्वीकारण्याचे संकेत दिले.
मी माझे मन घट्ट केले आहे. मुख्यमंत्रिपदावर राहण्याची माझी इच्छा नाही. मी माझा राजीनामा तयार ठेवला असून, ‘वर्षा’वरून ‘मातोश्री’वर मुक्काम हलविण्याची तयारी केली आहे. हे माझे नाटक नाही. मी पदावरून पायउतार व्हायला तयार आहे. संख्या हा विषय गौण आहे. मात्र, लोकशाहीत डोकी मोजली जातात. त्यामुळे एक मत जरी माझ्या विरोधात गेले तरी ते माझ्यासाठी लाजिरवाणे आहे. माझ्यावर अविश्वास ठरावाची वेळ येऊ नये यासाठी तुम्ही समोर येऊन सांगा, मी राजीनामा देण्यास तयार आहे, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करीत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला आव्हान दिले आहे. एकनाथ शिंदेंनी बंडाचा झेंडा हातात घेऊन ४८ तास उलटले, तरीही शिवसेनेला शिंदेंचे बंड शमविण्यात यश आलेले नाही. उलट एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मानणाऱ्या आमदारांच्या संख्येत भर पडू लागली आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद सोडण्याची तयारी दर्शविताना मुख्यमंत्री शिवसेनेचा झाला तर अधिक आनंद होईल, असे सांगून नेतृत्वाचा चेंडू शिंदे गटाकडे टोलवला आहे.
एकनाथ शिंदे यांनी आपल्या बंडाला हिंदुत्वाची विचारधारा आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा मुलामा दिला आहे. त्याचाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी समाचार घेतला. शिवसेना हिंदुत्वापासून दूर जाऊ शकत नाही, हिंदुत्व हा शिवसेनेचा श्वास आहे. मुख्यमंत्री म्हणून विधानसभेत मी हिंदुत्वाची भूमिका मांडली आहे, याकडे उद्धव ठाकरे यांनी लक्ष वेधले. आता शिवसेना बाळासाहेबांची राहिलेली नाही, या आरोपाचाही त्यांनी समाचार घेतला. बाळासाहेबांच्या पश्चात २०१४ मध्ये आपण एकट्याच्या ताकदीवर ६३ आमदार निवडून आणले. मग ही शिवसेना कुणाची, तर बाळासाहेबांचीच आहे. त्यानंतर मधल्याकाळात जे मिळाले ते याच शिवसेनेमुळे मिळाले, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
आघाडी सरकारचे गठन होत असताना मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी अनपेक्षितपणे अंगावर आल्याचा खुलासा करताना उद्धव ठाकरे यांनी भावूक होत पक्षातील आमदारांकडून दगाफटका होत असल्याबद्दल खंत व्यक्त केली. त्यासाठी त्यांनी झाड आणि पक्षांची छोटी गोष्ट सांगितली. झाड तोडले जात असताना पक्षी त्या झाडाला विचारता की या घावाच्या तुला वेदना होत असतील. त्यावर कुऱ्हाडीचे जे घाव बसतात त्याचे मला दु:ख नाही. मात्र, कुऱ्हाडीचा दांडा झाडापासूनच बनलेला असल्याने त्याचे मला वाईट वाटते, असे झाडाने पक्षांना सांगितल्याची गोष्ट उद्धव ठाकरे यांनी पक्षातील बंडखोरीवर जळजळीत भाष्य केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ हे मला फोन करून सांगतात की, आम्ही तुमच्यासोबतच आहोत. मात्र, माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्रिपदी नको असेन, तर काय बोलायचे. कु-हाडीचा दांडा गोतास काळ असेच बेालावे लागेल, असे म्हणताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भावनिक झाले होते. मला पदाचा मोह नाही. हे सरकार स्थापन होत असताना जेव्हा तिन्ही पक्षांची एकत्रित बैठक झाली, तेव्हा शरद पवार यांनी मला एका मिनिटासाठी बाजूला नेले आणि सांगितले की, जर हे सरकार चालायचे असेल, तर तुम्हीच मुख्यमंत्रीपद स्वीकारले पाहिजे. तेव्हा देखील मी म्हणालो होतो की, ज्या माणसाने साधी कधी महापालिका पाहिली नाही त्याला थेट मुख्यमंत्रीपद कसे काय देता. मात्र, त्यांनी सांगितल्यानंतर मी पद स्वीकारले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देखील माझ्यावर विश्वास दाखविला. एका जिद्दीने मी काम सुरू केले. मात्र, लगेचच कोरोना आला. ज्या माणसाला कधीच प्रशासनाचा अनुभव नव्हता त्याच्यासमोर हे आव्हान उभे राहिले, पण सगळयांच्या मदतीने त्यावरही मात केली. देशातील पाच सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांच्या यादीत माझे नाव आले. मी भेटत नाही असे सांगण्यात येते. कोरोना नंतर माझ्या पाठिची शस्त्रक्रिया झाली. त्यानंतरचे दोन-तीन महिने अतिशय कठिण गेले. या काळात मी कोणाला भेटलो नाही हे खरे आहे, पण आता मी भेटायला सुरुवात केली होती, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.