
Mumbai : संजय राऊत यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी

भांडुप-कांजूरमार्ग भागातील शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी
मुकुंद लांडगे
मुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना मुंबई येथील निवासस्थानातून सक्तवसुली संचलनालयाच्या(ED) पथकाने अटक केल्यानंतर भांडुप-कांजूरमार्ग या भागात त्यांच्या समर्थनार्थ बॅनर लावण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. ईशान्य मुंबईतील शिवसैनिक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बरोबर असून, येत्या महापालिका निवडणुकीत पुन्हा सेनेची सत्ता आणणार असल्याचेही सेनेचे पदाधिकारी मामा मंचेकर(Mama Manchekar) यांनी आज सांगितले.
संजय राऊत यांच्या अटकेनंतर शिवसेनेतर्फे(ShivSena) विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे, तर त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ कांजूरमार्ग-भांडुप परिसरात अनेक ठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत. ‘बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक, मोडेन पण वाकणार नाही; लढत राहणार, लढणार आणि जिंकणार’ अशा आशयाचे बॅनर जागोजागी लावण्यात आले आहेत. ते सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. या बॅनरच्या माध्यमातून केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला आहे. शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हे बॅनर(banner) लावले आहेत, अशी माहिती मामा मंचेकर यांनी दिली आहे.
ज्यांनी गद्दारी केली आहे त्यांना येत्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेची सत्ता आणून सणसणीत चपराक देण्यात येईल, त्यामुळे सच्चा शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या बरोबर राहावे, असे मामा मंचेकर (सेना पदाधिकारी) यांनी म्हटले आहे.