
Mumbai : सेना आमदारांना बैठकीला हजर राहण्याचे आदेश, अन्यथा कारवाई

प्रशांत बारसिंग
मुंबई : (Mumbai) बंडखोर आमदारांविरोधात शिवसेनेकडून(Shiv Sena) आता कारवाई सुरू करण्यात आली असून, बैठकीला हजर रहा, अन्यथा आमदारकीसाठी अपात्र ठरवू, अशी पत्रे बंडखोर आमदारांना पक्षाकडून पाठविण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेनेचे पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांच्यासह सर्व आमदारांना पत्र पाठविण्यात आली आहेत.
बैठकीला उपस्थित राहिला नाहीत, तर थेट कारवाई
शिवसेनेने पाठविलेल्या पत्रानुसार बैठकीला उपस्थित राहिला नाहीत, तर थेट कारवाई करणार असल्याचे आमदारांना ठणकावून सांगण्यात आले आहे. आमदारांना पाठविलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे की, पक्षांतर घडवून सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न होत असल्यामुळे आणि राज्यात निर्माण झालेली राजकीय परिस्थिती लक्षात घेता अशा परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आज म्हणजेच, बुधवार 22 जून, 2022 रोजी मुख्यमंत्र्यांचे(Chief Minister) निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर संध्याकाळी 5 वाजता तातडीची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीस आपली उपस्थिती आवश्यक आहे, याची नोंद घ्यावी. सदर सूचना आपण महाराष्ट्र विधानसभेत नोंदणी केलेल्या ई-मेल, पत्यावर देखील पाठविण्यात आली आहे. त्या व्यतिरिक्त सदर सूचना आपणास समाज माध्यमे, व्हॉट्स ॲप आणि एसएमएसद्वारेही पाठविण्यात आली आहे. या बैठकीस लिखित स्वरुपात वैध आणि पुरेशी कारण दिल्याशिवाय या बैठकीला तुम्हाला गैरहजर राहता येणार नाही. सदर बैठकीत आपण उपस्थित न राहिल्यास स्वेच्छेने शिवसेना पक्षाचे सदस्यत्व सोडण्याचा तुमचा स्पष्ट इरादा आहे, असे मानल जाईल आणि परिणामी आपणावर भारतीय संविधानातील सदस्यांच्या अपात्रते संदर्भात असलेल्या तरतुदींनुसार कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची शक्यता
दरम्यान, सध्या महाराष्ट्रात राजकीय पेच निर्माण झाला आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. राज्यातील राजकारणावर या बंडाचा थेट परिणाम होणार आहे. एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्यासोबत जवळपास 40 आमदार असल्याचे मानण्यात येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील ठाकरे सरकार पणाला लागले आहे. एकनाथ शिंदे समर्थक आमदारांसह स्वतंत्र गट बनविणार असल्याचेही समजते. यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्यासह समर्थक आमदारांचा मुक्काम सध्या आसामच्या गुवाहाटीमधील हॉटेल रॅडिसन ब्ल्यूमध्ये आहे.