
Mumbai : संजय राऊतांच्या घरातून साडेअकरा लाख रुपयांची रक्कम जप्त

ईडी चौकशी सुरुच
Indiagroundreport वार्ताहर
मुंबई : संजय राऊत यांच्या घरातून ईडीने(ED) ११ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. सोबतच प्रॉपर्टीची काही कादगपत्रेही जप्त केली आहेत. शिवसेना नेते संजय राऊत(Sanjay Raut) यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. सध्या त्यांना मुंबईच्या ईडी कार्यालयात नेण्यात आले आहे. या साडेअकरा लाख रकमेबाबत संजय राऊत यांची ईडीकडून चौकशी केली जात असल्याची माहिती समोर येत आहे.
आज सकाळी सात वाजताच्या सुमारास ईडीच्या पथकाने राऊत यांच्या घरी छापा टाकला होता. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून संजय राऊतांची ९ तास चौकशी करण्यात आली. यानंतर संजय राऊत यांना ईडीने (ED) ताब्यात घेतले व ईडी कार्यालयात घेऊन गेले.
पत्राचाळ व्यवहारात आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप संजय राऊतांवर करण्यात आला होता. संजय राऊत(sanjay raut) ईडीच्या अधिकाऱ्यांना चौकशीदरम्यान सहकार्य करीत नव्हते, अशीही माहिती समोर आली आहे. ईडीचे पथक संजय राऊतांना ताब्यात घेवून मुंबईच्या ईडी कार्यालयात पोहचले असून, संजय राऊतांची चौकशी सुरू आहे.
दरम्यान, ईडी कारवाईत जाण्यापूर्वी संजय राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सूचक वक्तव्य केले. ते म्हणाले की, भविष्यामध्ये मी आत असेन किंवा बाहेर त्याची मला पर्वा नाही, याहीपेक्षा मी मोठे स्फोट करीत राहीन तेव्हा भाजपला कळेन मी काय आहे. जी काही कारवाई व्हायची ती होऊ द्या, मी काही घाबरत नाही. राजकीय सूडोपोटी हा खेळ सुरू आहे. माझा पक्ष माझ्या पाठिशी आहे, उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) माझ्या पाठिशा आहे, शिवसैनिकांच बळ आहे. संजय राऊतला महाराष्ट्र ओळखतो, देश ओळखतो ते शिवसेनेमुळे. हा संजय राऊत कधी गुडघ्यावर चालत नाही आणि सरपटत जात नाही, निधड्या धातीने उभे राहतो आणि लढतो, कुणी काहीही म्हणू द्या. या कारवाईला मी निधड्या छातीने समोर जातो आणि लढतो. यातूनच महाराष्ट्राला बळ मिळेल. या ज्या राजकीय सुडाच्या कारवाया सुरू आहेत, फक्त भाजपविरोधी लोकांवर सुरू आहेत. आमच्यासारखेही काही लोकं आहेत, जे न झुकता न घाबरता कारवायांना सामोरे जातात आणि लढाई लढतात. अशा कारवायांच्या भीतीने अनेक लोक पक्ष सोडून जातात, शरणागती पत्करतात, संजय राऊत त्यातले नाही. मरेन पण झुकणार नाही, वाकणार नाही, शिवसेना(Shiv Sena) सोडणार नाही.