
Mumbai : पत्नी आणि मुलीवर केला ॲसिड हल्ला

मुकुंद लांडगे
मुंबई : (Mumbai) चारित्र्याच्या संशयावरून एका पतीने त्याच्या पत्नीवर आणि मुलीवर काल ॲसिड हल्ला केला आहे. ही घटना मालाड मालवणी(Malad Malvani) येथील गेट क्रमांक-७ येथे घडली. जखमी माय-लेकीला कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर आरोपीला मालवणी पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी केली अटक
आरोपीला त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता, त्यातूनच हा ॲसिड हल्ला करून तिला जीवे मारण्याचा त्याने प्रयत्न केला. या घटनेनंतर तो पसार झाला होता. मात्र, पोलिसांनी त्याला अटक(arrested) केली. जखमी पत्नीस सध्या शताब्दी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी लोकांनी दाखल केले. सोबतच तिची लहान मुलगीही आहे.
ज्वलनशील पदार्थ टाकून जाळण्याचा प्रयत्न
दरम्यान, ६ वर्षांपूर्वी त्याचा विवाह झाला होता. हा आरोपी मुंबईतच एका बांगड्या बनविण्याच्या कंपनीत काम करतो, तर त्याची पत्नी गोरेगाव(Goregaon) येथे सुरक्षारक्षकाची नोकरी करीत होती. त्यामुळे तिच्या काम करण्यावर तो नाराज होता. तर दुसरीकडे त्याला तिच्या चारित्र्यावर संशय होता. यातूनच तो तिला मानसिक आणि शारीरिक यातना देत होता. या घटनेआधीही शुक्रवारी रात्री दोनच्या सुमारास त्याने तिला बेदम मारहाणही केली होती. इतक्यावरच तो थांबला नाही, तर त्याने त्यावेळीही तिच्यावर ज्वलनशील पदार्थ टाकून जाळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यावेळी ती त्यातून वाचली होती. काल मात्र त्याने तिच्यावर ॲसिड टाकल्याने स्थानिक नागरिकांनी तिला आणि मुलीला रुग्णालयात दाखल केले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी तिचा जबाब घेतला असून, आरोपी विरोधात गुन्हा नोंदविला. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली.