
Mumbai : 33 गुन्हे अंगावर असलेला फरार गुन्हेगार पणजीमध्ये अटकेत

मुकुंद लांडगे
पणजी : मुंबईसह राज्यभरात तब्बल ३३ अनेक गुन्ह्यांत फरार असलेला गुन्हेगार विक्रांत देशमुख ऊर्फ विक्की याला पणजी पोलिसांनी(Panaji Police) उत्तर गोव्यातून काल रात्री (शनिवार) उशिरा अटक केली. पणजी येथील एका कॅसिनो परिसरातून त्याला अटक करण्यात आली असून, मुंबईतील गुन्ह्यांत त्याला पणजी पोलिसांच्या कायदेशीरबाबी पूर्ण झाल्यानंतर मुंबई पोलीस त्याचा ताबा घेणार असल्याचे सांगण्यात आले.
विक्रांत देशमुख याला अटक करतेवेळी त्याचा एक सहकारी पोलिसांची नजर चुकवून पसार झाला आहे. विक्की आपल्या कुटुंबासोबत गोव्यात आला असता तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला. उत्तर गोव्यातील पणजी पोलिसांना मुंबई पोलिसांनी(Mumbai Police) दिलेल्या माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. विक्रांत याच्यावर मुंबईसह महाराष्ट्रात ३३ गंभीर गुन्हे नोंद आहेत, तर सध्या तो मुंबईतील नेरुळ येथे हत्या आणि मोक्का प्रकरणात पोलिसांना हवा होता. उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक शोबित सक्सेना यांच्या म्हणण्यानुसार, विक्की हा कळंगुट येथील एका हॉटेलमध्ये उतरला होता. काल तो पणजी येथील कॅसिनोमध्ये येणार असल्याची गुप्त माहिती पणजी पोलिसांना मिळाली होती, त्यानुसार ही अटक करण्यात आली आहे.