
Mumbai : एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना 24 तासाचा अल्टिमेटम

राजा आदाटे
मुंबई : (Mumbai) बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या शिवसेनेच्या आमदारांना 24 तासाचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. बाहेर असलेल्या शिवसेना आमदारांना जर आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडावे आणि वेगळा विचार करावा असे वाटत असेल, तर तोदेखील विचार करू. मात्र, तुम्ही आधी 24 तासात मुंबईत येण्याची हिंमत दाखवावी. मुंबईत आल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत प्रत्यक्ष चर्चा करावी, असे आवाहन खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी गुरूवारी केले आहे.
सुटका झालेल्या आमदारांनी कथन केली कहाणी
‘वर्षा’ निवासस्थानात आज शिवसेना नेते आणि आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यादरम्यान शिवसेनेचे आमदार कैलाश पाटील आणि नितीन देशमुख(Nitin Deshmukh) यांनी एकनाथ शिंदे यांच्यापासून सूरतमधून कशी सुटका केली, याबाबत आपले अनुभव मांडले. त्यांच्या वक्तव्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी 24 तासाचा अल्टिमेटम दिला आहे.
गुवाहाटीमधील 21 आमदारांसोबत झाला संपर्क
पत्रकारांना(journalists) व इतरांना व्हॉट्सॲपवर हॉटेलमधील फोटो, व्हिडिओ पाठविण्यापेक्षा प्रत्यक्षात येऊन चर्चा करावी. आमचा गुवाहाटीमधील 21 आमदारांसोबत संपर्क झाला असल्याची माहिती यावेळी संजय राऊत यांनी दिली.
संजय राऊत यांनी म्हटले की, राज्याबाहेर गेलेले शिवसेनेचे 20-25 आमदार पुन्हा शिवसेनेत येतील, असा विश्वास आहे. महाविकास आघाडीतून बाहेर पडावे अशी इच्छा असेल, तर तुम्ही प्रत्यक्षात भेटून चर्चा करावी. मात्र, त्यांचा हा बहाणा आहे. सरकारमधून बाहेर पडावे असे त्यांना वाटत असते, तर त्यांनी प्रत्यक्षात चर्चा केली असती.