
Kolhapur: कस्तुरी सावेकरकडून माऊंट एव्हरेस्ट शिखर सर

Indiagroundreport वार्ताहर
कोल्हापूर : (kolhapur) गिर्यारोहक कस्तुरी दीपक सावेकर(Kasturi Deepak Savekar) हिने जगातील सर्वोच्च शिखर माउंट एवरेस्ट आज सकाळी सहा वाजता सर केले. तिच्या या उत्तुंग कामगिरीमुळे कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. गेल्यावर्षी नैसर्गिक आपत्तींमुळे अपुरे सोडावे लागलेले स्वप्न तिने यावर्षी पूर्ण केले.
एव्हरेस्टवर(Everest) पहिले पाऊल पडताच तिने तिरंगा व भगवा ध्वज फडकाविला. तिच्या या यशामुळे कोल्हापूरकरांचा ऊर अभिमानाने भरून आला आहे.
कस्तुरीने हे आपले दैदिप्यमान यश लोकराजा कै. राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्वास समर्पित केले आहे आणि माउंट एव्हरेस्टवरून तिने शाहू महाराज यांना अभिवादन केले आहे.
कस्तुरी 24 मार्च 2022 ला माऊंट एव्हरेस्ट मोहिमेला गेलेली होती. या मोहिमेतील सरावाचा भाग म्हणून कस्तुरीने चढाईसाठी जगातील 14 अष्टहजारी शिखरांपैकी सर्वात अवघड व खडतर असणारे दहाव्या क्रमांकाचे शिखर माऊंट अन्नपूर्णा-1 शिखर उंची 26545 फूट निवडले व यशस्वीरित्या सर केले.
कमी वयात अन्नपूर्णा शिखर सर करणारी ती जगातील तरुण गिर्यारोहक ठरली
हे शिखर सर करून कस्तुरी दि. 4 मे ला एव्हरेस्ट बेस कॅम्पला पोहचली व 9 मे रोजी रात्री 9 वा. चढाईला सुरुवात केली व 10 तारखेला दुपारी कॅम्प 2 ला पोहोचली. तेथे दोन दिवस थांबून 12 तारखेला कॅम्प 3 ला पोहोचली. दि. 13 तारखेला दुपारी कॅम्प 4 ला पोहोचली, तेथे थोडी विश्रांती घेऊन रात्री 7:00 वाजता तिने फायनल समिट पुशला सुरुवात केली.
पूर्ण रात्र चालून 14 तारखेला सकाळी 6 वा. तिने जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एन्हरेस्टवर भारताचा तिरंगा व करवीर नगरीचा भगवा ध्वज फडकविला. या मोहिमेसाठी उमेश झिरपे सर यांचे मागदर्शन लाभले, तसेच फिटनेस कोच व मेन्टॉर म्हणून जितेंद्र गवारे व जिम कोच म्हणून विजय मोरे यांचे मार्गदर्शन लाभले. या मोहिमेसाठी नेपाळ मधील ऐट के एक्झिबिशन (8 K Expedition) या एजन्सीचे तांत्रिक सहाय्य लाभले.
कस्तुरी हे सर्व करीत असताना आता तिच्या परिवारासमोर आर्थिक एव्हरेस्टचा डोंगर उभा राहिला आहे. सदर मोहिमेला अंदाजे 49 लाख रू. खर्च येतो, आतापर्यंत रुपये २८,५६,७००/- एवढी रक्कम कालपर्यंत जमा झाली होती ही रक्कम महाराष्ट्रातील व देश – विदेशमधील तमाम जनतेने तसेच दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था संघटना, औद्योगिक संस्था या साऱ्यांना मदतीने उभी राहिली.
उर्वरीत रक्कम कस्तुरीच्या पालकांनी समाजातील घटकांकडून शब्दावर कर्ज काढून उभी केली आहे. या जिगरबाज करवीर कन्येला पुढील भावी वाटचाल यशस्वी करण्यासाठी तिच्या पालकांना कर्जाच्या ओझ्यातून मुक्त करण्यासाठी समस्त हितचिंतक आणि करवीर हायकर्स ग्रुप(Karveer Hikers Group) आपणा सर्वांना आवाहन करीत आहे
आज दिवसभर मंगळवार पेठेतील तिच्या घरी पालकाच्या अभिनंदनाची शब्दश रीघ लागली होती, तर चौका-चौकातील तरुण मंडळे-तालीम संस्थाच्या वार्ता फलकावरूनही एव्हरेस्टवीर कस्तुरीचे आकर्षक मजकुरासह अभिनंदन करण्यात आले होते.