
Thane : कुठे पाणीप्रश्न पेटला?

पाण्यासाठी स्थानिक नागरिकांचा बिल्डरच्या कार्यालयासमोर मोर्चा
महिलांनी हातात पाण्याच्या बाटल्या घेऊन काढला मोर्चा
Indiagroundreport वार्ताहर
डोंबिवली : कल्याण ग्रामीणमधील पाणीप्रश्न आता चांगलाच पेटला आहे. काही दिवसांपूर्वी पाण्यासाठी भाजप-मनसे(BJP-MNS) एकत्रित मोर्चा काढला, तरीसुद्धा महापालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. त्यातच काल पाणी नसल्याने कपडे धुण्यास खदानीवर गेलेल्या गायकवाड कुटुंबातील 5 जणांचा दुःखद मृत्यू झाल्याने ग्रामस्थ संतप्त झाले, तर दुसरीकडे डोंबिवलीतील देसलेपाडा परिसरात राहणारे नागरिकही पाण्यासाठी आक्रमक झाले असून, रस्त्यावर उतरले आहेत.
देसलेपाडा परिसरात(Desalepada area) एकूण 12 सोसायटी असून, या सोसायटीत महानगरपालिकेचे 24 तास पाणी असेल असे सांगून या इमारतीच्या 60 ते 65 रहिवाशांना विकासकांनी घरे विकली. मात्र, पिण्याचे पाणी येत नसल्याने या नागरिकांनी विकासकाच्या कार्यालयासमोर आज रविवारी पाण्याच्या बॉटल हातात घेत मोर्चा काढला. यावेळी त्यांनी आपला राग व्यक्त करीत आठ दिवसात पाणी मिळाले नाही, तर आयुक्त कार्यालासमोर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान पाणीटंचाईने पाच जणांचे बळी घेतले, आता तरी प्रशासनाला जाग येईल का?, असा सवाल नागरिक विचारित आहेत.
