
Kalyan : ‘त्या’ मृत कासवांवर वनविभागाने केले अग्निसंस्कार

१३ कासवांना वाचविण्यात वॉर रेस्क्यू टीमला यश
सचिन सागरे:
कल्याण (Maharashtra News) [India]: (Kalyan) दोन दिवसांपूर्वी कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा तलावात (Gauripada Lake) मृत झालेल्या कासवांवर वनविभागाने नियमाप्रमाणे अग्निसंस्कार केले आहेत, तर १३ कासवांना वाचविण्यात वॉर रेस्क्यू टीमला यश आले आहे.
कल्याण (पश्चिम) येथील गौरीपाडा तलाव हा मस्त्य-व्यवसाय आणि गौरीगणपती विसर्जनासाठी प्रसिद्ध आहे. मोठ्या प्रमाणात येथे मासे पकडून विक्री केली जाते. अशा या तलावात दोन दिवसांपासून खूप दुर्गंधी पसरली होती आणि येथील स्थानिक नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले होते. माजी नगरसेवक दया गायकवाड यांनी वॉर संस्थेच्या हेल्पलाईनवर संपर्क केला, तेव्हा वॉर रेस्क्यू टीम घटनास्थळी गेली असता तेथील दृश्य हे मन विचलित करणारे होते. अशा ५०-६० मृतक कासवांचा तिथे खच पडला होता, तर अनेक कासव शेवटचा श्वास घेत होते.
घटनास्थळी वनविभागाचे(forest department) पंचनामा करीत असताना काही कासव किनाऱ्यावर तडफडत आढळून आले. त्यात ९ भारतीय मृदू पाठीचे कासव आणि ४ रेड इयर्ड स्लाइडर जातीचे कासव असे एकूण १३ कासवांना वॉर टीमने तत्काळ सुखरूप बाहेर काढले आहे, परंतु ते जगतील की मरतील याची आशा कमी आहे, तर ५३ कासवांवर वनविभागाने नियमाप्रमाणे अग्निसंस्कार केले असून, काही मयत कासवांना शवविच्छेदन अहवालाकरिता पाठविले आहे. लवकरच त्याचा अहवाल प्राप्त होईल.