
Kalyan: महामार्गांवर झाडे लावण्याची नितीन गडकरी यांच्याकडे मागणी

सहयोग सामाजिक संस्थेचे गडकरींना पत्र
सचिन सागरे
कल्याण: देशभरातील महामार्गांवर झाडे लावण्याची मागणी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari) यांच्याकडे कल्याण मधील सहयोग सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विजय भोसले(Vijay Bhosale) यांनी पत्राद्वारे केली आहे. नितीन गडकरी भारतातले विकास पुरुष आहेत. त्यांचे एकमेव खाते आहे की ज्यांचे संपूर्ण भारता मध्ये काम दिसत आहे. मात्र जे राजमार्ग बनवत आहेत, त्या एकाही रस्त्याच्या बाजूने व मधून झाडे लावलेली आढळत नाही.
हे रस्ते करतांना लाखो झाडे तोडली गेली आहेत. उदा,मुंबई ते पुणे एक्सप्रेस, गोवा महामार्ग, नाशिक महामार्ग, समृद्धी महामार्ग, धुळे ते तुळजापूर, अशा अनेक रस्त्याचे काम चालू आहे. काही कामे झाली आहेत. पण हे रस्ते करताना पर्यावरणाचा विचार केलेला दिसून येत नाही. पनवेल ते गोवा महामार्गावर हजारो वडाचे झाडं होते. प्रत्येक वडाच्या झाडांचा बुंधा हा एका घरा एवढा होता. १०० ते २०० वर्ष असणारी ती झाडे होती,पण आज त्या महामार्गावर एकही वडाचे झाड दिसत नाही.
देशात विकास तर हवा पण त्याचं बरोबर पर्यावर्णाचाही विचार झाला पाहिजे. रस्त्यावर लाखो, करोडो रुपये खर्च करतात. त्यात अजून थोडा खर्च वाढवून वड, पिंपळ, पर्यावरणाला पोषक अशी झाडे लावा. आज तापमान जे वाढत आहे ते पर्यावरणाला अनुसरून विकास न केल्यामुळे होत आहे. तरी येणाऱ्या भावी पिढी साठी प्रत्येक महामार्गावर झाडे लावण्याचा निर्णय घ्यावा, व आपण ते करून दाखवालं ह्याचा आम्हाला ठाम विश्वास असल्याचे विजय भोसले(Vijay Bhosale) यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.