
Bhiwandi : पावसाला सुरुवात होताच खचले रस्ते

निकृष्ट रस्तेबांधणीवर महापालिका गप्पच; प्रवाशी व नागरिकांना त्रास
शारिफ अंसारी
भिवंडी : भूमिगत ड्रेनेज लाईन(drainage line) टाकल्यानंतर ईगल कंपनीने तेथे रस्ताचे काम केले. मात्र, पाऊस सुरू होताच हे रस्ते खचले असल्याचे उघड झाले आहे. यामुळे येथील प्रवाशी व नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. मात्र असे असतानाही महापालिकेचा संबंधित विभाग याबाबत उदासीनच आहे.
महापालिका प्रशासन मात्र डोळे मिटून झोपेत
भिवंडी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ५० कोटी रुपयांची भुयारी गटार बांधकाम योजना राबविण्यात आल्याची माहिती आहे. 2016 मध्ये राज्य सरकारने 428 कोटी रुपये मंजूर केले होते. उल्हासनगरच्या ईगल इन्फ्रास्ट्रक्चरला(Eagle Infrastructure) रस्ते कंत्राट देण्यात आला आहे. पाच वर्षांत हे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित 34 किमी गटाराचे काम करणे बाकी आहे. मात्र पावसाला सुरुवात होताच प्रभाग क्रमांक ३, नारायण कंपाऊंड, गैबीनगरसह शहरातील प्रत्येक भागातील रस्ते तुटून यातून गटारांचे पाणी वाहू लागले आहे. रस्त्यांवर खड्डे दिसू लागले आहेत. असे असतानाही महापालिका प्रशासन मात्र डोळे मिटून झोपेत आहे. निकृष्ट रस्ते बांधकामाबाबत महापालिका या ठेकेदारांवर पूर्णपणे मेहरबानी दर्शवित आहे. याबाबत महापालिका आयुक्त विजयकुमार म्हसाळ म्हणाले की, आता जिथे ड्रेनेज लाईन टाकली आहे तो रस्ता थोडा पावसाचे पाणी जाण्यासाठी सोडला आहे. पावसानंतर सर्व रस्ते रीतसर बांधले जातील. मात्र, या प्रकरणात ईगल कंपनीच्या कोणत्याही जबाबदार व्यक्तीने फोन न उचलल्याने त्यांच्याशी याबाबत चर्चा होऊ शकलेली नाही.