
Article : राजकारणातल्या नव्या पिढीला बळ देणारे निकाल

मुंबई (Maharashtra News) [India]:
राज्यातील नगरपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल आता हाती आले आहेत. हा कौल म्हणजे मतदारांनी महाविकास आघाडीच्या पारड्यात आपले वजन टाकले असून, राष्ट्रवादीला पहिल्या क्रमांकावर नेवून ठेवले आहे. सर्वोच्च न्यायलायाच्या निर्णयानंतर ओबीसी आरक्षण जिथून गेले त्या जागांवर खुल्या प्रवर्गातून हे मतदान झाले. ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्यामुळे राज्यातील 106 नगर पंचायतींसाठी दोन टप्यांमध्ये मतदान झाले. त्यापैकी 97 नगरपंचायतीचे निकाल जाहीर झाले. त्यामध्ये सर्वाधिक 27 नगर पंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व मिळविले आहे. राष्ट्रवादीला या निवडणुकांमध्ये मिळालेले यश भरभरून आहे. त्यांचे यश मागच्या निवडणुकीच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहे. मुख्य म्हणजे ते राज्याच्या सगळ्या भागांमध्ये मिळालेले आहे.
शिवसेना आणि काँग्रेसलाही वेगळे लढले, तरीही फायदा झालेला दिसतो. काँग्रेस तर संघटना म्हणून फार आक्रमक नसतांनाही त्या-त्या नेत्यांच्या भागांमध्ये मिळालेले यश एकत्रित केले तर ते जास्त आहे. निकालात 22 नगर पंचायतींसह भाजप दुसऱ्या, 21 नगरपंचायतींसह काँग्रेस तिसऱ्या, तर 17 नगर पंचायतींसह शिवसेना चौथ्या क्रमांकावर आहे. अन्य पक्षांनी 10 नगरपंचायतींवर आपला झेंडा रोवला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांना एकत्र मिळून 67 नगरपंचायतींवर ताबा मिळविता आला आहे आणि त्यांच्याकडे 944 जागा आल्या आहेत. मात्र, जिंकलेल्या उमेदवारांच्या एकूण संख्येवर भाजपने प्रथम क्रमांक मिळविल्याचा दावा केला आहे.
2014 ते 18 दरम्यान पार पडलेल्या नगरपंचायतींच्या निवडणुकांत राष्ट्रवादी तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष होता. पहिला क्रमांक भाजपचा, तर दुसरा मोठा पक्ष काँग्रेस होता. यावेळी मात्र राष्ट्रवादीने आपली कामगिरी सुधारली आहे. त्यांच्या जागा गेल्या निवडणुकीच्या तुलनेत दुप्पट झाल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादीचा गड आहे आणि अपेक्षेप्रमाणे त्यांना त्याठिकाणी सगळ्यात जास्त यश म्हणजे 101 जागा मिळाल्या आहेत. गेल्या वेळेस त्यांच्याकडून सुटून भाजपकडे गेलेल्या नगरपंचायतीही त्यांनी परत मिळविल्या आहेत. त्यामुळे यंदा महाविकास आघाडीत जास्त फायदा हा राष्ट्रवादीला झाला आहे. शिवसेना आणि काँग्रेसला त्यांच्या बालेकिल्ल्यांमध्ये यश मिळाले आहे.
शिवसेनेला एकूण 284, तर काँग्रेसला एकूण 316 जागा राज्यभरात मिळाल्या आहेत. सेनेला कोकणात आणि उत्तर महाराष्ट्रात त्यांची आघाडी टिकविता आली आहे. मराठवाड्यात भाजपचे सर्वाधिक सदस्य आहेत, पण विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात, जिथे त्यांची ताकद आहे, तिथे त्यांना अपेक्षित यश मिळालेले नाही. सोयगाव नगरपंचायतीमध्ये प्रतिष्ठा पणाला लावूनही केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांना भाजपची सत्ता टिकविता आली नाही. तिथे अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची सत्ता आली. ही निवडणूक चारही प्रमुख पक्ष स्वबळावर लढले होते. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या जिल्ह्यात म्हणजे जालन्यात 5 नगरपंचायतीत राष्ट्रवादीने वर्चस्व मिळविले. येथे 85 पैकी 34 जागा राष्ट्रवादीला मिळाल्या. शिवसेनेला 22, तर भाजपला 14 जागा मिळाल्या.
भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेल्या एकनाथ खडसे यांनाही त्यांच्या विभागात शिवसेनेने धक्का दिला आहे, तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाही भाजपने धक्का दिला आहे. पालघर, सिंधुदूर्ग आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादीला एकही नगरपंचायत मिळविता आलेली नाही. रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा एकदा शिवसेनेतील धुसफूस चव्हाट्यावर आलेली पाहायला मिळाली. येथे रामदासभाई कदम आणि त्यांचे पुत्र आमदार योगेश कदम यांचे खच्चीकरण झालेले चित्र पाहायला मिळाले. येथे राष्ट्रवादीच्या हातात सत्ता गेली आहे.
या निवडणुकीमुळे राज्यात ट्रेंड सेट व्हायला सुरूवात झाली आहे. या निकालांचा परिणाम येत्या महापालिका निकालांवरही पडेल. ओबीसी आरक्षण या सरकारमुळे गेले, मराठा आरक्षण महाविकास आघाडी सरकारने घालविले, हे घोटाळेबाजांचे सरकार आहे, असे सारे आरोप भाजपने केले होते. ते लोकांना फारसे पटलेले नाहीत. या निवडणुकीतून अजून एक चित्र आहे म्हणजे बऱ्याच ठिकाणी नवी तरुण पीढी समोर आली आहे. राष्ट्रवादीचे तरूण आमदार रोहित पवार यांनी अहमदनगर जिल्ह्यात आपला एक हाती ठसा उमटविला आहे, तर राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांनी राजकारणात दिमाखदार एन्ट्री केली आहे.
त्यांच्या नेतृत्वाखाली कवठे महांकाळ नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी पॅनेलने 10 जागांवर विजय मिळवून एकहाती सत्ता स्थापन केली. त्यांच्या विरोधात तर सारे पक्ष एकवटले होते. कवठेमहांकाळ, कडेगाव आणि खानापूर नगरपंचायतीच्या निवडणूक निकालाने राजकारण्यांना नवा संदेश दिला आहे. यानिमित्ताने आर. आर. आबांचे पुत्र रोहित पाटील यांचा जनतेने राजकीय मंचावर घडवून आणलेला दणदणीत प्रवेश आणि कडेगावमध्ये राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांना बसलेला पराभवाचा धक्का प्रस्थापितांच्या राजकारणाला आत्मपरीक्षण करायला लावणारा आहे. कडेगावच्या निवडणुकीत भाजपने 11 विरुद्ध 5 अशी एकहाती सत्ता काबीज करीत काँग्रेसचे पानीपत केले.
अनेक राजकीय समीकरणांचा बोध देणारी ही निवडणूक ठरली आहे. प्रत्येक पक्षाच्या स्वबळाच्या निकालाचा हा ट्रेंड आहे. त्याची एकूण बेरीज भाजपला दूर फेकणारी ठरली आहे. भाजपच्या महाविकास आघाडीविरोधातील प्रचाराला जनतेने नाकारले आहे. भाजपकडे 106 आमदार असतानाही त्यांचा मताचा टक्का घसरला आहे. गेल्या वेळेपेक्षा भाजपची संख्या अर्ध्यावर आलेली आहे. एक मात्र खरे की, राजकारणातल्या नव्या पिढीला बळ देणारे हे निकाल आहेत.
- राजा आदाटे