
Amravati : सेनेचे आमदार नितीन देशमुख परतले मतदारसंघात

Indiagroundreport वार्ताहर
अमरावती : सेनेचे आ. नितीन देशमुख(Nitin Deshmukh) आपल्या मतदारसंघात परतले आहे. सेनेतील मंत्री एकनाथ शिंदेंनी बंड करून ४० आमदार सोबत नेल्याचा दावा केला. त्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. यात अकोला जिल्यातील बाळापूर मतदार संघाचे आमदार नितीन देशमुख सोबत होते. ते मात्र मतदार संघात परतत असताना अमरावतीमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्याचे स्वागत केले. यावेळी त्यांनी सूचक विधान केले. सर्व आमदारांनी आपल्या मतदार संघात परत यावे. आम्ही उद्धव ठाकरे सोबत आहोत, असे ते म्हणाले.
आमदार नितीन देशमुख यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली होती. सूरतमध्ये(Surat) दाखल झाल्यानंतर पहाटेच्या सुमारास आमदार नितीन देशमुख यांच्या अचानक छातीत दुखू लागले. त्यानंतर गंभीर अवस्थेत आमदार देशमुख यांनी सूरत येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची बातमी समोर आली होती. नितीन देशमुख यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली होती. आज आमदार देशमुख यांना रुग्णालयात दाखल करताच या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर आमदार नितीन देशमुख हे नागपुरात दाखल झाले असून, त्यांनी आपल्याला कोणताही हार्ट ॲटॅक आला नसल्याचे पत्रकारांना सांगितले आहे.