
Ahmednagar : प्रतीक पवार हल्ल्याची चौकशी ‘एनआयए’कडे सोपवा : नितेश राणे

प्रशांत बारसिंग
मुंबई : अहमदनगर जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातील प्रतीक पवार या युवकावर समाज माध्यमांतून नुपूर शर्मा यांचे समर्थन केल्यामुळे मुस्लीम युवकांनी केलेल्या हल्ल्याची राष्ट्रीय तपास यंत्रणेमार्फत चौकशी करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे(Nitesh Rane) यांनी शनिवारी केली.
भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पद्धतीचे हल्ले या पुढील काळात सहन केले जाणार नाहीत, असा इशाराही नितेश राणे यांनी यावेळी दिला.
नितेश राणे म्हणाले की, नुपूर शर्मा(Nupur Sharma) यांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याप्रकरणी ४ ऑगस्ट रोजी अहमदनगर येथील कर्जत तालुक्यातील प्रतीक पवार या तरूणावर मुस्लीम तरूणांनी धारदार शस्त्रांनी हल्ला करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यात पवार हा युवक गंभीर जखमी झाला. या हल्लाप्रकरणी फरार आरोपींना तातडीने अटक करावी.
नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यानंतर उदयपूर, अमरावती व आता कर्जत येथे घडलेली ही तिसरी घटना आहे. हिंदूवर वारंवार हल्ले केले जात आहेत, या पुढे हे हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत. धार्मिक भावना दुखाविल्यावर घटनेचा जरूर निषेध करावा, पण तो लोकशाही मार्गाने केला पाहिजे. शरियतनुसार कायदा हाती घेऊन हिंदूंना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करू नये, असेही नितेश राणे यांनी यावेळी नमूद केले.
नितेश राणे पुढे म्हणाले की, भाजपने नुपूर शर्मा यांच्या ‘त्या’ व्यक्तव्याचे समर्थन केले नाही. त्यांना पक्षातून निलंबित केले. हा विषय आता संपला असताना हिंदूवर असे हल्ले होत आहेत. हिंदू देव-देवतांची विटंबना केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत, त्या प्रत्येकवेळी आम्ही लोकशाही मार्गाने(democratic way) अशा घटनांचा निषेध केला आहे. राज्यात मविआ सरकार नसून हिंदुत्व जपणारे सरकार आहे, तेव्हा अशा प्रकारे हल्ले करण्याचे प्रयत्न कोणी करू नये.