India Ground Report

Entertainment : अभिजीत सावंतने सांगितला ‘इंडियन आयडल’मध्ये निवडीचा किस्सा

Indiagroundreport वार्ताहर
मुंबई : (Mumbai)
‘मोहब्बतें लुटाऊंगा’ हे गाणं ऐकले तर आपल्या डोळ्यासमोर लोकप्रिय गायक अभिजीत सावंत हे नाव येते. या गाण्याने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले होते. या गाण्यामुळे प्रसिद्धीझोतात आलेला अभिजीत सावंत आजही अनेकांच्या लक्षात आहे. अभिजीत सावंत हा ‘इंडियन आयडल'(‘Indian Idol’) या अतिशय लोकप्रिय ठरलेल्या रिॲलिटी शोमुळे घराघरात पोहोचला. इंडियन आयडलचे पहिले पर्व गायक अभिजीत सावंतने जिंकले होते. मात्र, त्याच्यासाठी हा प्रवास फार कठीण होता. नुकतेच त्याने बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

यावेळी अभिजीत सावंत(Abhijit Sawant) म्हणाला की, त्यावेळी मी साधारण २१ वर्षांचा होतो. माझे पदव्युत्तर शिक्षण घेत होतो. त्याबरोबर माझे गाणेही सुरु होते. त्यावेळी मला संगीत क्षेत्रात करिअर करायचे होते, पण तेव्हा ते फार अवघड होते. माझे आई-वडील संगीत क्षेत्रातील नसल्यामुळे मला तसे वाटत होते. त्यानंतर मी काही कार्यक्रमात गाणी म्हणायला सुरुवात केली. छोट्या छोट्या सोसायटींमध्ये जाऊन मी माझे शो करायचो. त्यातून माझी थोडीफार कमाई व्हायची. यातून गाणं शिकण्यासाठी लागणाऱ्या फीचीही सोय व्हायची. त्यावेळी मी इतका प्रसिद्ध होईन, या उंचीवर जाईन, असे अजिबात वाटत नव्हते. मला आजही आठवतंय की, मुंबईतील दादर परिसरात इंडियन आयडलचे ऑडिशन्स(auditions) सुरु होते. त्यावेळी तिथे फार कमी लोक आले होते, कारण हा शो नेमका काय, त्यात काय असणार याबद्दल कोणालाच माहिती नव्हती. मी आणि माझे बरेच मित्र टाईमपास करावा म्हणून त्या रांगेत उभे राहिलो. काहीवेळाने माझे बरेच मित्र निघून गेले, पण मी मात्र तिथेच थांबलो आणि ऑडिशन दिली. त्यानंतर याचं हळूहळू प्रमोशन सुरु झाले. तेव्हा सगळ्यांना समजले की, हा खूप मोठा शो आहे. अशाप्रकारे छोट्या स्टेजवरुन मी इंडियन आयडलच्या मोठ्या स्टेजवर आलो. त्यांच्या माध्यमातून मी जगासमोर आलो.

Exit mobile version